सोसायटीची मराठी कुटुंबाला इंग्रजीत नोटीस; जाब विचारताच म्हणाले, मराठीला गोळी मारा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:35 IST2025-03-22T18:35:04+5:302025-03-22T18:35:48+5:30
मला इंग्रजी कळत नाही तुम्ही मराठीतून नोटीस द्या असं कित्येकदा सोसायटी कमिटीला सांगितले. मात्र आम्ही मराठीतून नोटीस नाही देणार असं कमिटीने म्हटलं असा आरोप महिलेने केला.

सोसायटीची मराठी कुटुंबाला इंग्रजीत नोटीस; जाब विचारताच म्हणाले, मराठीला गोळी मारा...
वसई - पालघर जिल्ह्यातील वसई येथे मराठी कुटुंबाची गळचेपी केल्याचा प्रकार घडला आहे. याठिकाणी एका गृहनिर्माण सोसायटीने मराठी कुटुंबाला मासिक शुल्क न भरल्याने नोटीस पाठवली. ही नोटीस इंग्रजी भाषेत होती. त्याबाबत मला इंग्रजी कळत नाही, मराठीत सांगा असं महिलेने सोसायटी पदाधिकाऱ्यांना विचारले. तेव्हा मराठीला गोळी मारा...असं संतापजनक विधान पदाधिकाऱ्याने मराठी महिलेला केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित सोसायटी पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वसईच्या नायगाव येथील रोशन पार्क या सोसायटीत ही घटना घडली आहे. या घटनेबाबत पीडित मराठी महिला म्हणाली की, सोसायटीने माझे पाणी कापले, त्याबद्दल मी त्यांना विचारायला गेली होती. त्यावेळी तुम्हाला ३ महिन्यापासून नोटीस दिली आहे असं पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही नोटीस इंग्रजीतून दिली होती, मला इंग्रजी कळत नाही तुम्ही मराठीतून नोटीस द्या असं कित्येकदा सोसायटी कमिटीला सांगितले. मात्र आम्ही मराठीतून नोटीस नाही देणार असं कमिटीने म्हटलं असा आरोप केला.
या बैठकीत महिलेने पदाधिकाऱ्यांना जाब विचारताना तुम्ही मराठीतून नोटीस द्या, इंग्रजीतून नको तेव्हा तुम्ही मराठीला गोळी मारा, आम्ही मराठीतून नोटीस देणार नाही असं पदाधिकाऱ्याने म्हटलं. त्यावर तुम्ही महाराष्ट्रात राहता, मग असं कसं बोलू शकता, मराठीला गोळी मारा असं मी पदाधिकाऱ्यांना विचारले असंही या महिलेने सांगितले.
दरम्यान, नुकतेच चारकोप येथील एअरटेल गॅलरीत मराठी न बोलण्यावरून वाद झाला होता. या गॅलरीत मराठी मुलगा त्याची तक्रार मांडण्यासाठी गेला असता संबंधित एअरटेलच्या कर्मचाऱ्याने तुम्ही हिंदीत बोला, मराठीत बोलू नका असं म्हटलं. त्यावर मी मराठीतच बोलणार असं मुलगा म्हणाला. त्यावर महिला कर्मचाऱ्याने मराठी मुलासोबत वाद घातला. या वादात मनसे, उद्धवसेनाही उतरली. त्यानंतर एअरटेलने या प्रकारावर माफी मागत पुन्हा असं घडणार नाही अशी ग्वाही दिली.