वसईत १५६ बांधकामे पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:22 IST2018-12-01T00:21:50+5:302018-12-01T00:22:00+5:30
भूमाफियांना जबरदस्त दणका : संयुक्त कारवाई, तीन दिवसांत ३३३ सदनिका, गाळे निष्कासित

वसईत १५६ बांधकामे पाडली
वसई : महानगरपालिका क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईनंतर गुरुवारी सायंकाळी शासकीय जमिनीवर झालेल्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात आले. यात मोरी गावातील गाळे व रिहवासी खोल्या मिळून १५६ बांधकामे तोडण्यात आली.
गत दोन दिवासांत वसई महसूल खात्याने वसई पूर्वेला शासकीय जमिनीवर संयुक्त रित्या बेकायदा बांधकामावर तोडू कारवाईचा बडगा उगारला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याची चर्चा असून या पूर्वी त्या विरोधात कोणतीही कारवाई का नाही करण्यात आली या बाबत सवाल विचारला जात आहे.
जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाने वसई प्रांतांच्या नेतृत्वाखाली मागील दोन दिवस झाले वसई महसूल विभाग, महापालिका , पोलीस, पंचायत समिती यांनी संयुक्तरित्या येथील कामण, पोमण आणि मोरी गावातील शासनाच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असल्याची बाब निदर्शनास आली होती.
त्यानुसार वसई प्रांत अधिकाऱ्यांनी नियोजन बद्ध रित्या बैठक घेऊन जागेवर पोलीस बंदोबस्त महसूल यंत्रणा उभी करून दि. २८ नोव्हेबर रोजी १७७ बांधकामे भुईसपाट केली तर दि.२९ नोव्हेंबर रोजी १५६ बांधकाम जमीनदोस्त करून या दोन दिवसात एकूण ३३३ बांधकामांवर बुलडोजर चढवून शासकीय जमिनी रिकाम्या केल्या असल्याची माहिती वसई प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लोकमत ला दिली.
या कारवाईत ७० हुन अधिक कर्मचारी अधिकाºयांनी संयुक्त रित्या कारवाई केली.
बुधवारी कामंण, पोमण मधील १७७ व्यावसायिक गाळे आणि रहिवासी खोल्या तसेच गुरु वारी मोरी गावातील गाळे व रिहवासी खोल्या मिळून १५६ अशी एकूण ३३३ बांधकामे निष्कासित करण्यात आली.
तहसीलदारांचे जनतेला आवाहन
शासकीय जागेवर करण्यात येत असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे कुणीही घरे अथवा खोल्या विकत घेऊ नयेत तसेच, विकत घेत असलेल्या मालमत्तेच्या अधिकृतते बाबत नागरिकांनी खात्री करावी. त्यामुळे आपली होणारी फसवणूक टाळता येईल असे आवाहन तहसीलदार वसई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले.