मागोवा 2020: शेतकऱ्यांवर कोरोनासह अवकाळीचे दुहेरी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:54 IST2020-12-26T23:54:22+5:302020-12-26T23:54:53+5:30
पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

मागोवा 2020: शेतकऱ्यांवर कोरोनासह अवकाळीचे दुहेरी संकट
- वसंत भोईर
वाडा : पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र २०२० वर्षाचा मागोवा घेताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीसह अतिवृष्टी आणि अवकाळीच्या दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागले. खरीप हंगामाच्या काळात या वर्षी लांबलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना संकट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातील रब्बी हंगामातील कडधान्य पिके, भाजीपाला पिके, फळपिके, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून या धक्क्यातून शेतकरीराजा अद्याप सावरलेला नाही.
भातखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक
अवकाळीमुळे भातपिकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यातूनही जे काही हाती लागले आहे, ते भात खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे नंबर लागले आहेत. काही केंद्रांवर पोती नाहीत, तर काही ठिकाणी भात चांगले नसल्याने ते घेतले जात नाही. महामंडळाचे अधिकारी आणि मिलर यांचे साटेलोटे असल्याने केंद्रावर नेऊनदेखील भात दर्जेदार नसल्याचे कारण सांगून भात खरेदी करत नाहीत. त्यामुळे तेच भात मिलर मातीमोल किमतीत खाजगीमध्ये खरेदी करीत आहेत.
कर्जफेड करणारे उपाशी
महाराष्ट्रात ठाकरे सरकारने केलेल्या कृषी कर्जमाफीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रूपयांचा सरकारी लाभ देण्याचे घोषित केले होते, परंतु कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना हा लाभ अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळे कर्ज थकविणारे तुपाशी, तर कर्जफेड करणारे उपाशी अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.