वाडा औद्योगिक क्षेत्रावर बेकारीची कुऱ्हाड
By Admin | Updated: September 21, 2015 03:44 IST2015-09-21T03:44:16+5:302015-09-21T03:44:16+5:30
शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या वाड्यामध्ये वीस वर्षांपूर्वी औद्योगिक विकासाला सुरुवात झाल्याने त्याची फळे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली

वाडा औद्योगिक क्षेत्रावर बेकारीची कुऱ्हाड
वसंत भोईर, वाडा
शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या वाड्यामध्ये वीस वर्षांपूर्वी औद्योगिक विकासाला सुरुवात झाल्याने त्याची फळे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली. मात्र, वीज सवलतीला कात्री लागल्याने अनेक उद्योजकांनी आपले व्यवसाय येथून गुंडाळले आहेत. एकंदरीतच यामुळे येथील हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. स्थानिक व परगावचे कामगार या भागात उपजीविकेसाठी वेगवेगळ्या लघू व मोठ्या उद्योगांमध्ये काम करतात. हातांवर पोट असणाऱ्या या कामगारांवर यामुळे उपासमारीची वेळ आहे. कारखाने सुरू ठेवण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कामगार आणि उद्योजकांकडून होत आहे.
येथील ग्रामीण आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी सरकारने २० वर्षांपूर्वी या भागात ‘डी प्लस झोन योजना’ जाहीर केली. या योजनेत कारखानदारांना अनेक सवलती देण्यात आल्या. यामध्ये १३ वर्षे विक्रीकरात सूट, ३० टक्के प्रकल्पांत रोख अनुदान, वीजदरात १० ते १२ टक्के सवलत अशा अनेक सवलती देण्यात आल्या. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले बस्तान बसविले. मात्र, काही महिन्यांपूर्वी विजेच्या दरात अचानक वाढ करण्यात आल्याने लोखंडाचे अनेक कारखाने बंद झाले आहेत.
विजेच्या वाढीव दरामुळे उत्पादनासाठी जास्त खर्च येत असल्याने कारखानदारांनी कारखाने बंद ठेवले आहेत. विजेचे दर वाढल्याने एकेक कारखाना बंद होत असल्याने वाड्यातील सर्वच पक्ष आणि इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्या वतीने मोठे आंदोलन गेल्या काही महिन्यांपूर्वी छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत किरकोळ प्रमाणात विजेचे दर कमी केले होते. मात्र, आता पुन्हा तसेच दर सुरू झाल्याने कारखान्यांना कुलूप लागले आहे. आशिया खंडातील लोखंडाची महत्त्वाची बाजारपेठ वाडा आता शेवटची घटका मोजत आहे.
तालुक्यातील घोणसई व डाकिवली या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मोनाटोना ही टायर उत्पादन करणारी कंपनी असून यात सुमारे एक हजारांच्या आसपास स्थानिक (मराठी) कामगार आहेत. मात्र, ही कंपनीसुद्धा कधी सुरू तर कधी बंद असते. त्यामुळे हजारो स्थानिक कामगारांवर बेकारीची वेळ येऊ शकते.