‘ती’ अनधिकृत इमारत जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:18 IST2020-02-18T23:18:24+5:302020-02-18T23:18:39+5:30
पालिकेची धडक कारवाई : विशेष नियोजन प्राधिकरणचाही सहभाग

‘ती’ अनधिकृत इमारत जमीनदोस्त
पारोळ : अनधिकृत बांधकामां-विरोधात महापालिकेने कारवाईची धडक मोहीम उगारली असून आता या कारवाईत विशेष नियोजन प्राधिकरणानेदेखील उडी घेतली आहे. विशेष नियोजन प्राधिकरणच्या प्र.सहआयुक्त मनाली शिंदे यांनी पथकासह नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले व उपायुक्त डॉ. किशोर गवस यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
महापालिका प्रशासनात जी गावे समाविष्ट नाहीत, त्या गावांच्या समुचित विकासासाठी महापालिकेने विशेष नियोजन प्राधिकरण समितीची स्थापना केली आहे. या विशेष नियोजन प्राधिकरणाची सूत्रे सध्या प्र.सहआयुक्त मनाली शिंदे या सांभाळत आहेत. विशेष नियोजन प्राधिकरणाने चंद्रपाडा परिसरात केलेल्या कारवाईत भुईसपाट करण्यात आलेल्या बांधकामानंतर आता बेकायदा बांधकामांवर पुन्हा कारवाईच्या मोहिमा धडकणार असल्याची चर्चा आहे. प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत अनधिकृतपणे बांधण्यात आलेली तीन माळ्याची आरसीसी इमारत भुईसपाट करण्यात आली. या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केल्यानंतर विशेष नियोजन प्राधिकरणाच्या कारवाईचा भूमाफियांनी धसका घेतला आहे.