दु:खाच्या प्रसंगी दोन कुटुंबांनी जपली सामाजिक बांधिलकी; एकाच दिवशी दोन देहदान; तिघांना मिळणार जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:00 IST2025-08-04T09:59:00+5:302025-08-04T10:00:26+5:30
या प्रेरणादायी कार्यामागे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचा सततचा प्रयत्न आणि समर्पित भूमिका महत्त्वाची ठरली. शनिवारी पार पडलेल्या या तीनही दानप्रक्रिया यशस्वी झाल्या.

दु:खाच्या प्रसंगी दोन कुटुंबांनी जपली सामाजिक बांधिलकी; एकाच दिवशी दोन देहदान; तिघांना मिळणार जीवदान
नालासोपारा : सामाजिक बांधिलकी जपत, मृत्यूनंतरही समाजासाठी काही तरी देण्याची भावना जपत वसई आणि कांदिवलीतील दोन कुटुंबांनी आपल्या घरातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर देहदान आणि नेत्रदान केले आहे. या प्रेरणादायी कार्यामागे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचा सततचा प्रयत्न आणि समर्पित भूमिका महत्त्वाची ठरली. शनिवारी पार पडलेल्या या तीनही दानप्रक्रिया यशस्वी झाल्या.
पहिल्या घटनेत कांदिवली येथील रहिवासी जितेंद्र चितलिया (८४) यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र राजेश आणि अमित चितलिया तसेच कुटुंबातील सदस्य मनीष विनोदराय गांधी यांनी देहदानासाठी पुढाकार घेत पुरुषोत्तम पवार यांच्याशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक सर्व औपचारिकता पार पाडली. मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये हे देहदान यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दाेन कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन जणांना जीवदान मिळणार आहे.
डाॅक्टरांची महत्त्वपूर्ण भूमिका
साईनगर वसईचे रहिवासी कृष्णराज पालेजा (७४) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केवळ देहदान नव्हे तर नेत्रदान करण्याचाही निर्णय घेतला. दुःखाच्या क्षणीही समाजोपयोगी विचार करत त्यांनी घेतली सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरली. या प्रक्रियेत सागर वाघ यांच्या सहकार्याने डॉ. निकम आणि डॉ. अवधेश मिश्रा यांनी नेत्रसंकलनाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर देह नालासोपारा येथील दुबे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. संपूर्ण समन्वयासाठी कुसुम इगी मेनेजेस आणि जॉनी मेनेजेस यांनी अथक मेहनत घेतली.
भावनिकऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन
देहदानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी मानवी शरीरशास्त्र अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात. समाजाने याकडे केवळ धार्मिक वा भावनिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मृत्यूनंतरचे आयुष्यही अर्थपूर्ण करण्याचा विचार करून सकारात्मक पाठिंबा दिला पाहिजे, असे पुरुषोत्तम पवार म्हणाले. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.