तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:54 IST2019-07-15T05:54:00+5:302019-07-15T05:54:07+5:30
ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे.

तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के
- सुरेश काटे
तलासरी : ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. शनिवारी रात्री १०.५२च्या सुमारास तलासरी आणि डहाणू परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या बुधवारीच (१० जुलै) येथे २.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती. सततच्या धक्क्यांमुळे तलासरी तालुक्यातील ७५ जिल्हा परिषद शाळा व ५२ अंगणवाड्या, तसेच अनेक घरांच्या भिंतींना तडे जाऊन त्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर प्रशासनाने डहाणू, तलासरी तालुक्याच्या काही भागांत तंबू टाकून दिले. मात्र, लोकसंख्येच्या मानाने ते अपुरे पडले. त्याचप्रमाणे, भूकंपाच्या धक्क्यांनी येथील शाळा व अंगणवाड्या धोकादायक बनल्याचा अहवाल महसूल विभागाने दिल्यानंतर, प्रशासनाने त्यांना ताडपत्र्या पुरविल्या व तंबू उभारण्याच्या सूचना केल्या, परंतु प्रत्यक्षात तंबू उभारण्यात आले आहेत का? याची पाहणीच न केल्याने ताडपत्र्या अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे हजारो आदिवासी मुलांना धोकादायक शाळा अंगणवाड्यांत जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे.
दरम्यान, या प्रकाराची माहिती घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर शाळांना ताडपत्र्या पुरवून तंबू बांधण्याच्या सूचना करण्यात आल्याचे तलासरीचे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगितले.
>ग्रामपंचायतींना पत्र लिहून तंबू बांधून देण्याबाबत कळविले आहे, पण ते दखल घेत नसल्याने ताडपत्र्या अंगणवाड्यांत पडून आहेत. अंगणवाड्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले आहेत.
- आनंद जाधव, प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प, तलासरी.