तीन वेळा पोलीस संरक्षण दिले अन् अचानकपणे काढून घेतले ? हा कसला पोरखेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 07:58 PM2021-01-06T19:58:34+5:302021-01-06T19:59:14+5:30

Police Protection : पोलीस संरक्षणासाठी वसई पूर्वेतील आदिवासी सेवकाची राज्य सरकार दरबारी धडपड

Three times the police gave protection and abruptly removed? What a child's play | तीन वेळा पोलीस संरक्षण दिले अन् अचानकपणे काढून घेतले ? हा कसला पोरखेळ

तीन वेळा पोलीस संरक्षण दिले अन् अचानकपणे काढून घेतले ? हा कसला पोरखेळ

googlenewsNext
ठळक मुद्दे 29 जुन1987  ला वसई पूर्व स्थित कामण गावचे सुपुत्र स्व.यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

आशिष राणे 

वसई - वसई पुर्व कामण गावात राहणाऱ्या आपल्या मोठया सख्ख्या बंधूच्या खूनाच्या खटल्यात प्रत्यक्ष साक्षिदार म्हणून आजवर सरकार व न्यायालयासोबत लढाई लढणारे राज्य सरकार पुरस्कृत आदिवासी सेवक  गंगाधर म्हात्रे यांची पोलीस संरक्षणासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून सरकार दरबारी धडपड सुरु आहे. 29 जुन1987  ला वसई पूर्व स्थित कामण गावचे सुपुत्र स्व.यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

त्यावेळी हा खून होताना त्यांचे भाऊ गंगाधर म्हात्रे हे घटनास्थळी हजर होते व तेव्हा पासून आजमितीला या खटल्यातील ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून खटला लढवीत आहेत. मात्र, तितक्याच पोटतिडकीने ते न्यायासाठी वणवण देखील फिरत आहेत.  दरम्यान मागील 33 वर्षे आपल्या दिवंगत भावाच्या खऱ्या गुन्हेगार तथा खुन्यांना शासन होण्यासाठी गंगाधर म्हात्रे एकाकी लढा देत आहेत. एकूणच या खून खटला प्रकरणात म्हात्रे हे प्रत्यक्ष मुख्य साक्षीदार बअसल्यामुळे म्हात्रे यांना त्यावेळी शासनाकडून विनामुल्य पोलीस संरक्षण देण्यात आले होते.  मात्र कालांतराने हे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आल्यानंतर म्हात्रे यांच्यावर 13 एप्रिल 2015 रोजी  प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे कोकण विभागिय आयुक्तांच्या आदेशानुसार दि 14 सप्टेंबर 2016 ला म्हात्रे यांना पुन्हा पोलीस संरक्षण देण्यात आले. आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते कोणतेही कारण न देता पालघर पोलीस अधीक्षक कार्यलयाने दि.24 मे 2017 ला काढून घेतले. त्यानंतर या खटल्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 एप्रिल 2018 त्यांना तिसर्‍यांदा पोलीस संरक्षण देण्यात आले. ते पुन्हा 9 डिसेंबर 2019 ला काढून घेण्यात आले. दरम्यान,सख्या भावाच्या खुनाचा लढा लढत असताना,गंगाधर म्हात्रे यांनी आदिवासी बांधवांच्या अनेक प्रश्‍नांना वाटा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला. तर त्यामुळे शासनाकडून त्यांना आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

एकंदरीत स्व.यादव म्हात्रे खून खटला आता अंतीम टप्प्यात आला आहे.या खटल्याच्या सुनावणीसाठी,साक्ष देण्यासाठी म्हात्रे यांना स्थानिक पेक्षा जिल्हा किंवा राज्यभर किंवा बाहेर देखील  ठिकठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळेच त्यावेळेस त्यांच्यावर पोलीस संरक्षण नसताना प्राणघातक हल्ला झाला होता व आता तो अधिक होण्याचे संकेत आहेत. तसेच अनुसुचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक प्रकरणातही म्हात्रे हे  साक्षीदार आहे.

 

गंगाधर म्हात्रेची राष्ट्रीय जनजाती जमाती आयोगापुढे साक्ष 

राष्ट्रीय जनजाती जमाती आयोग दिल्ली यांच्याकडेही साक्ष दिल्यामुळे आपलाही खून होण्याची भिती स्वतः गंगाधर म्हात्रे यांनी आता राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत म्हात्रे यांना  गृह खात्यामार्फत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही गंगाधर म्हात्रे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे लोकमत बोलताना सांगितले.

 

आपल्याकडे 1 ऑक्टोबर 2020 पासून आयुक्तांलय झाले त्यामुळे पोलीस संरक्षण बाबतीत आता आपण वसई विरार पोलीस आयुक्त यांच्याशी  संपर्क करा त्यातच मधल्या काळात म्हात्रे प्रकरणात राष्ट्रीय जनजाती जमाती आयोग दिल्ली संदर्भात बैठक झाली होती मात्र मी आता बाहेर असल्याने कागदपत्रे समोर नाही त्यानुसार याबाबतीत अधिक बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. - डॉ माणिक गुरसळ, पालघर जिल्हाधिकारी

 

या संदर्भात वसई विरार पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांना संपर्क केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही

 

आदिवासी सेवक तथा अर्जदार म्हात्रे यांना पोलीस संरक्षण मिळण्याबाबत त्यांनी संबंधित पत्रव्यवहार काय केला आहे व त्याची पोलीस आयुक्तांलय कार्यालयाकडून माहिती घेतो व त्यानंतरच या प्रश्नी उचित कार्यवाही करू या - प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 , वसंत नगरी  वसई पूर्व कार्यालय

 

म्हात्रे यांची प्रतिक्रिया

वसईत 33 वर्षं झाली माझ्या भावाच्या खुन्याच्या खटल्यातील मी प्रत्यक्ष साक्षीदार असून पोलीस संरक्षणासाठी माझी फरफट सुरू आहे, खरंतर या खून खटल्यात मी साक्षीदार असल्याने मला तीन वेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. परंतु डिसेंबर 2019 पासून ते काढून घेतल्यानंतर माझ्यावर  प्राणघातक हल्ला ही झाला. आणि आताही जीवाला धोका आहे. त्यामुळे मी पुन्हा विनामुल्य पोलीस संरक्षणाची मागणी  केली आहे. - गंगाधर म्हात्रे, आदिवासी सेवक,वसई पूर्व कामण

Web Title: Three times the police gave protection and abruptly removed? What a child's play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.