तलासरीत बिबळ्याचे तीन हल्ले; जखमींवर गुजरातच्या रुग्णालयात उपचार; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 00:14 IST2025-05-04T00:12:43+5:302025-05-04T00:14:26+5:30
पालघर जिल्ह्यात सोयीसुविधांचा अभाव

तलासरीत बिबळ्याचे तीन हल्ले; जखमींवर गुजरातच्या रुग्णालयात उपचार; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
अनिरुद्ध पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, बोर्डी: तलासरी तालुक्यातील करंजगाव आणि धामणगाव येथे शिवारात काम करणाऱ्यांवर बिबळ्याने शनिवारी पहिला हल्ला सकाळी साडेआठ आणि दुसरा हल्ला नऊ वाजताच्या सुमारास केला. हे दोन्ही हल्ले धामणगाव आणि करंजगाव येथे झाले. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष शेतकरी जखमी झाला. तर तिसरा हल्ला दुपारच्या सुमारास वनरक्षकावर झाला. दुपारच्या वेळी करंजगावच्या पाड्यावरील घराच्यालगत खुराड्यात बिबळ्या आश्रयाला होता. त्याच्या शोधात बोर्डी वनपरीक्षेत्राची टीम मागावर असताना अचानक वनरक्षकावर हल्ला करून बिबळ्याने पंजाने उजवा हात रक्तबंबाळ केला. रक्तस्राव होऊन वनरक्षक घटनास्थळी खाली पडला.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या तिन्ही जखमींना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आल्याचे समजते. मात्र त्यानंतर तिघांनाही उपचारासाठी गुजरात राज्यातील वलसाड येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यापैकी वनरक्षक वगळता उर्वरित जखमी खाजगी रुग्णालयात भरती झाले.
चौकशीचे आदेश
दरम्यान, पालघर जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधेचा अभाव असल्याने सीमेलगतच्या गुजरात राज्यावर भिस्त आहे. जिल्ह्यात आयसीयू सुविधेअभावी डहाणूतील मातामृत्यूचे प्रकरण ताजे आहे. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेबाबत राज्य शासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.