‘त्यांच्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार सोडला’; जीवदान देणारा ठरला ‘मदर्स डे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:14 IST2023-05-15T14:05:15+5:302023-05-15T14:14:07+5:30
त्यामुळे ‘मदर्स डे’च्या दिवशी ती आत्महत्या करायला निघालेली असताना या ओळखीच्या झालेल्या लोकांमुळेच जणू तिला जीवदान लाभले.

‘त्यांच्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार सोडला’; जीवदान देणारा ठरला ‘मदर्स डे’
अशोक पाटील -
कुडूस : ‘मदर्स डे’चा दिवस तिला तिच्या जीवनात दिशा देणारा ठरला. एका ६२ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिला आभाळ कोसळल्यासारखे वाटले. तिचा धीर खचला; पण ती महिला अनेक वर्षांपासून वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने तिची वज्रेश्वरीतील काही लोकांशी ओळख झाली. त्यामुळे ‘मदर्स डे’च्या दिवशी ती आत्महत्या करायला निघालेली असताना या ओळखीच्या झालेल्या लोकांमुळेच जणू तिला जीवदान लाभले.
सुमन अशोक झित्रे (वय ६२) यांचे मुंबईत एका चाळीमध्ये संपूर्ण जीवन गेलेले. पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना एकच मुलगी होती, अशी परिस्थिती असताना, थकलेल्या शरीरामुळे काही काम करण्याचे त्राण उरले नव्हते. अशा विमनस्क स्थितीत काय करावे, असा विचार मनात कवटाळून सुमन वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आली. दर्शन घेऊन ‘आता माते मी आत्महत्या करीत असल्याने पुन्हा तुझ्या दर्शनाला येणार नाही म्हणून हात जोडून नमस्कार केला.’
देवीच्या मनात वेगळेच असल्याने तिची ही कृती तिथे उभ्या असलेल्या यूट्यूबवर चित्रण करणाऱ्या स्वप्नील शिंदे यांनी टिपली. चित्रण थांबवून सुमन यांच्याजवळ जाऊन तिची परिस्थिती समजून घेतली व स्वप्नीलने रुग्णमित्र मिलिंद कांबळे यांच्या साहाय्याने सुमन या असाह्य बेघर झालेल्या महिलेला अनाथाश्रमाचे मालक किसन लोखंडे याच्याकडे राहण्या- खाण्याची सोय केली. अशा प्रकारे ‘मदर्स डे’ या महिलेच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.