वंचित महिलांच्या तालमींना आला वेग
By Admin | Updated: March 24, 2017 00:57 IST2017-03-24T00:57:32+5:302017-03-24T00:57:32+5:30
वंचित समूहांना त्यांच्या समस्यांना, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने समता विचार प्रसारक संस्थेतर्फे

वंचित महिलांच्या तालमींना आला वेग
ठाणे : वंचित समूहांना त्यांच्या समस्यांना, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी ‘वंचितांच्या रंगमंचा’चे आयोजन केले जाते. यंदा वंचित महिलांचा नाट्यजल्लोष रविवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. टाउन हॉल येथील खुल्या रंगमंचावर सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील विविध वस्त्यांमधून गटबांधणीचे काम सुरू असून तालमींनाही वेग आला आहे.
या वेळी ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर मीनाक्षी शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आतापर्यंत माजिवडा, मनोरमानगर, सावरकरनगर, नवशिवाई कम्पाउंड, लोकमान्यनगर, किसननगर असे गट तयार झाले आहेत. त्यांच्या नाटिकांचे विषय ठरून आता त्यांच्या तालमींनाही सुरुवात झाली आहे. या अनोख्या उपक्रमात १५ पासून ७५ पर्यंतच्या गरीब वस्त्यांमधील महिला सहभागी होणार असून त्यांच्या नाटकांच्या विषयांत या वर्गातील स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना आलेल्या अनुभवांचा समावेश आहे. हुंड्याची समस्या, नवऱ्याचा जाच, मुलीच्या जन्माचा आग्रह, परित्यक्ता स्त्रीची व्यथा, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण अशा महिलांना भिडणाऱ्या अनेक विषयांवर नाटिका सादर होणार आहेत.
या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, माजी महापौर संजय मोरे, विद्यमान पालिका सभागृह नेते नरेश म्हस्के, ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद अनासपुरे, उदय सबनीस, विजू माने, अजेय संस्थेचे क्षितिज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लतिका सु.मो., जगदीश खैरालिया, हर्षलता कदम आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पुढाकार घेतला आहे.
(प्रतिनिधी)