पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ताब्यात घ्या; सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:52 IST2018-08-22T23:52:33+5:302018-08-22T23:52:58+5:30
करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने चालवण्यास घ्यावे अशी अट असताना सरकारनेच अटीचे उल्लंघन करत अद्यापही रूग्णालय चालवण्यास घेतलेले नाही.

पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ताब्यात घ्या; सरकारकडे मागणी
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेने पंडित भीमसेन जोशी रूग्णालय सरकारला हस्तांतरीत करण्याचा करारनामा करून तीन महिने झाले. करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने चालवण्यास घ्यावे अशी अट असताना सरकारनेच अटीचे उल्लंघन करत अद्यापही रूग्णालय चालवण्यास घेतलेले नाही. त्यामुळे आयुक्तांनी सरकारला पत्र पाठवून रूग्णालय पूर्णपणे ताब्यात घेऊन चालवण्याची विनंती केली आहे.
गोरगरीबांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून तत्कालिन नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या दट्यानंतर पालिकेने चार मजली इमारत बांधून २०० खाटांचे रुग्णालय सुरू केले. परंतु रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रणाच सुरू केल्या नाहीत. चांगले डॉक्टर तसेच आवश्यक कर्मचारीही नेमले नाही. भाजपा - शिवसेनेने मोठ्या थाटात उद्घाटन करुन राजकीय श्रेय लाटले. पण सामान्यांवर नीट उपचार होत नसल्याने सातत्याने टीका होत होती.
नुकतेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल पाच रूग्णांच्या मृत्यूनंतर पालिका वादात सापडली. सरकारने अहवाल मागवताच आयुक्तांनीही थातूरमातूर दिला. २४ मे रोजी पालिका व सरकारमध्ये करार झाला. करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने ताब्यात घेऊन चालवायचे होते. परंतु करार होऊन तीन महिने झालेतरी सरकारने रूग्णालय ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आरोग्य विभागास पत्र देऊन रूग्णालय ताब्यात घ्यावे अशी विनंती केली आहे.
काही गोष्टी प्रलंबित
सरकारचे काही डॉक्टर व कर्मचारी हजर झाले असून काही अधिकारी नेमणे तसेच स्वतंत्र बँंक खाते उघडणे प्रलंबित असल्याचे कारण यामागे असल्याचे कारण सांगितले जात आहे.