वाड्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या की संस्थेच्या भोंगळ कारभाराचे बळी? दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संतापलेल्या पालकांची शासनाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:38 IST2025-10-13T13:35:51+5:302025-10-13T13:38:28+5:30
आश्रमशाळांत मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा सुविधा नाहीत. आश्रमशाळेला असलेले तारेचे कम्पाउंड अनेक ठिकाणी तुटलेले आहे.

वाड्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या की संस्थेच्या भोंगळ कारभाराचे बळी? दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संतापलेल्या पालकांची शासनाकडे मागणी
वसंत भोईर
वाडा : आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी आश्रमशाळेतील देविदास नवले व मनोज वड या विद्यार्थ्यांनी ९ ऑक्टाेबर रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त पालकांनी शासनाकडे केली आहे.
आश्रमशाळेत दाेन्ही मुलांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, यापूर्वीही संस्थेच्या आश्रमशाळांत झालेल्या अशाच गंभीर घटना पाहता या आत्महत्या आहेत की, संस्थेच्या गलथान कारभाराचे बळी आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चाैकशी करावी, अशीही मागणी पालकांनी केली आहे.
सुरक्षा वाऱ्यावर
आश्रमशाळांत मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा सुविधा नाहीत. आश्रमशाळेला असलेले तारेचे कम्पाउंड अनेक ठिकाणी तुटलेले आहे. रात्री सुरक्षारक्षक असतो. मात्र, ती मुले मध्यरात्री बाहेर येऊन गळफास घेईपर्यंत सुरक्षारक्षकाला त्यांच्या हालचाली कशा लक्षात आल्या नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वीही घडल्या गंभीर घटना
नोव्हेंबर २०२२ मध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ शिक्षण संस्थेच्या परळी आश्रमशाळेत एका आदिवासी विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाच्या दबावाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळी ते प्रकरण संस्थेने दडपल्याची तक्रार मुलीचे वडील शंकर मालक यांनी मुख्यमंत्र्यांकडे करून निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली होती.
विक्रमगड तालुक्यातील माण आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, तर ऑगस्ट २०२४ मध्ये जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खुडेद येथील आश्रमशाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आजारावर योग्य उपचार न झाल्याने मृत्यू झाला होता.
तसेच, संस्थेच्या वाड्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. याप्रकरणी पालकांनी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवरून संस्थाचालक आणि स्थानिक शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
प्रफुल्ल पाटील, जिल्ह्याध्यक्ष,
पालघर जिल्हा काँग्रेस
आंबिस्ते येथील प्रकरणासंदर्भात एक चौकशी कमिटी नेमली असून, जव्हारच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी
डाॅ. अपूर्वा बासुर यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू आहे.
सुभाष परदेशी, सहायक प्रकल्प
अधिकारी, आदिवासी विकास विभाग
प्रकल्प कार्यालय, जव्हार
संस्थेच्या वतीने एक समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी प्रक्रिया सुरू आहे.
भरत सावंत, विश्वस्त