विक्रमगडच्या वेहेलपाड्यातील बोहाडा यात्रेला सुरुवात
By Admin | Updated: March 27, 2016 02:17 IST2016-03-27T02:17:26+5:302016-03-27T02:17:26+5:30
आदिवासी समाज म्हणजे परंपरा आणि संस्कृतीचा ठेवाच. विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाड्यावर शनिवारपासून बोहाडा यात्रेला सुरुवात झाली असून जगदंबेच्या दर्शनासाठी येथे

विक्रमगडच्या वेहेलपाड्यातील बोहाडा यात्रेला सुरुवात
- राहुल वाडेकर, तलवाडा
आदिवासी समाज म्हणजे परंपरा आणि संस्कृतीचा ठेवाच. विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाड्यावर शनिवारपासून बोहाडा यात्रेला सुरुवात झाली असून जगदंबेच्या दर्शनासाठी येथे पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली आहे. देवीचे मंदिर येथील विठ्ठलनगरात असून भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पताका आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत. हा पारंपारिक जत्रोत्सव तीन दिवस चालणार असून रंगपंचमीच्या दिवशी मोठया बोहाडयाने त्याची सांगता होणार आहे.
स्वतंत्र इतिहास असणारी आदिवासी समाजाची संस्कृती ही मानवी मूल्यांवर आधारीत आहे़ आदिवासी कोकणा समाजात लोककलेला फार महत्व आहे़ पारंपारिक नृत्यकला त्यांच्याकडे आहेत़ तसेच अनेक बोलीभाशाही आहेत़ त्या संस्कृतीमधील बोहाडा पाहण्यासाठी वेहलपाडयाच्या तसेच तालुक्यातील पंचक्रोशीतील लोक रात्री १०-१० मैल दूरवरुन चालत येतात़ यंदा हा बोहाडा पाहाण्यासाठी सुमारे १० हजाराहून अधिक आदिवासी दरवर्षीप्रमाणे एकत्र येतील असा अंदाज आहे.
गेल्या ५० वर्षापासून बोहाडा साजरा केला जातो़ या यात्रोत्सवात आयोजीत केल्याप्रमाणे २६ मार्च रोजी थाप २७ मार्च रोजी लहान बोहाडा (थाप) साजरी करण्यांत येते़ तर २८ मार्च रोजी मोठा बोहाडा (रंगपंचमी) असा तीन दिवस रात्री ८ पासून सकाळी ८ पर्यत या हा बोहाडा जगदंबा यात्रोत्सव साजरा करण्यांत येतो़
मशालींच्या उजेडात देवदेव...
या बोहाडा यात्रोत्सवात रामायण, महाभारत आदी पौराणिक ग्रंथातील देव-देवतांच्या पात्राची निवड करुन आदिवासी घरच्या घरी लाकुड, चिकणमातीचे आकर्षक मुखवटे तयार करतात़ हे मुखवटे घालून ती भूमिका करणारी पात्रे अनुरुप वेशभूषा करतात आणि रितीरिवाजाप्रमाणे मशालीच्या उजेडात आणि तालबध्द वाजंत्रीच्या तालावर रात्री आठ ते सकाळी आठ या दरम्यान हा बोहाडा बेभानपणे साजरा करतात.
प्रारंभी गजाननाला वंदन करुन त्यांचे सोंग (मुखवटा) नाचवला जातो़ त्यानंतर सरस्वती, विष्णू आणि पुराणातील देवदेवतांना तसेच देवदेवतांच्या युध्दांचे प्रसंग सोंगे नाचवून भक्तिभावाने सादर केले जातात़ या जल्लोषाच्या वातावरणात आदिवासी अगदी तल्लीन झालेले दिसतात़ विविध सोंगे नाचऊन देवतांच्या अनेक प्रसंगांचे सादरीकरण करण्यातच पहाट होते़ त्यानंतरजगदंबा मातेची विधीवत पूजा करुन तिच्या व महिषासुराच्या युध्दांचा प्रसंग साकारला जातो.
गावात रोगराई, संकटे येऊ नयेत म्हणूनच आदिवासी हा बोहाडा म्हणजेच जगदंबा यात्रोत्सव साजरा करतात ग़्रामदेवी नवसाला पावते अशी येथील आदिवासी लोकांची श्रध्दा असून यावेळी घेतलेले नवस फेडण्यासाठी व नवीन नवस बोलण्यासाठी लोक एकच गर्दी करतात़ या यात्रोत्सवाचा व बोहाडाचा आनंद सर्वच जाती, धर्माचे, पंथांचे भाविक मनापासून अनुभवतात.