तलासरीत लाव्हारस उसळल्याची अफवा, तो व्हिडिओ बोगस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:38 IST2019-06-25T23:36:37+5:302019-06-25T23:38:58+5:30
तलासरीत लाव्हारस उसळल्याचा व्हॉट्स अॅप मेसेज फिरू लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून भागात खळबळ माजली आहे

तलासरीत लाव्हारस उसळल्याची अफवा, तो व्हिडिओ बोगस
तलासरी - तलासरीत लाव्हारस उसळल्याचा व्हॉट्स अॅप मेसेज फिरू लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून भागात खळबळ माजली आहे, परंतु अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगून अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी केले असून अशी अफवा पसरविणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तलासरीच्या उधवा भागात खदाणीतून लाव्हारस बाहेर येत असल्याचा मेसेज व फोटो व्हॉटस अपवर फिरू लागल्याने भागात खळबळ उडाली, तलासरीच्या उधवा व करजगाव भागात प्रचंड खोल व मोठ्या खदानी असल्याने प्रथम लोकांना हे खरे वाटले. पण माहिती घेता असा कोणताही लाव्हारस बाहेर येत नसल्याचे समजले व ही अफवा असल्याचे समजल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबत उधवा गावचे सरपंच सुरेश शिंदा यांनी सांगितले की, परिसरात खदानीत असा काही प्रकार घडल्याचे दिसून आले नाही, ही अफवा आहे. तर करजगावाचे सरपंच लुईस काकड यांनीही असा प्रकार या भागात नसल्याचे सांगितले. तलासरीच्या उधवा व करजगाव भागात मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जातात याने जनता हैराण आहे. त्यातच खदानीत लाव्हारसच्या बातमीने त्यांच्यात घबराट पसरली.