Round of farmers without shopping malls; Time to travel 10-12 kms | खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांचा फेरा; १०-१२ किमी अंतरावर जाण्याची वेळ

खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांचा फेरा; १०-१२ किमी अंतरावर जाण्याची वेळ

वाडा : भिवंडी ग्रामीण मतदारसंघात वाडा तालुक्यातील कुडूस, नेहरोली परिसरातील ५५ गावे येतात. या गावांमध्ये भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या साडेसात हजारांहून अधिक आहे. या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात भात खरेदी केंद्र नसल्याने येथील शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी शहापूर व विक्रमगड मतदारसंघांतील वाडा तालुक्यातील समाविष्ट असलेल्या खरेदी केंद्रांवर भात विक्रीसाठी जावे लागत आहे. शेतकऱ्यांवर भात विक्रीसाठी गावापासून १० ते १२ किलोमीटर लांब अंतरावर जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुडूस येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

वाडा तालुका भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघांत विभागाला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे करत आहेत. तर, शहापूर मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा व विक्रमगड मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा करत आहेत.

शहापूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील परळी, गारगाव, मानिवली, कळंभे व खैरे-आंबिवली पाच ठिकाणी आधारभूत पद्धतीने भात खरेदी केंद्र सुरू आहेत. तर विक्रमगड मतदारसंघात वाड्यातील पोशेरी, गोऱ्हे, गुहिर व खानिवली या केंद्रांत आधारभूत भातखरेदी सुरू आहे. मात्र, वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या ५५ गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असे एकही भात खरेदी केंद्र नसल्याने येथील साडेसात हजार शेतकऱ्यांवर भात विक्रीसाठी दहा ते बारा किलोमीटर लांब अंतरावरील अन्य मतदारसंघातील केंद्रांवर भात विक्रीसाठी जावे लागत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. 
कुडूस परिसरात भात खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मी याबाबत पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घेतो, असे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी  सांगितले.

खानिवली केंद्रात साठवणूक क्षमता नाही
तालुक्यातील खानिवली येथे भात खरेदी केंद्र आहे, मात्र येथे मोठ्या प्रमाणात धानसाठा होईल अशी जागा नसल्याने येथील खरेदी काहीवेळ थांबवली आहे. त्यामुळे जवळच्या खैरे आंबिवली या केंद्रावर शेतकरी भात विक्रीसाठी नेत आहेत. मात्र, वाढीव खरेदीची क्षमता या केंद्रालाही दिलेली नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे.

Web Title: Round of farmers without shopping malls; Time to travel 10-12 kms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.