रोहयोची मजुरी सात महिने रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:38 IST2019-01-28T23:38:32+5:302019-01-28T23:38:59+5:30
मजुरी हेच रोजगाराचे साधन असणाऱ्या कुर्लोद गावातील गावकºयांना गत सात महिन्यांपासून केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

रोहयोची मजुरी सात महिने रखडली
मोखाडा : मजुरी हेच रोजगाराचे साधन असणाऱ्या कुर्लोद गावातील गावकºयांना गत सात महिन्यांपासून केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, ग्रामसेवकाने संकेतस्थळ बंद असल्याचे कारण देऊन हात वर केले आहेत.
रोजगार हमी योजनेच्या निकषाप्रमाणे मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम हे धोरण असूनही या गावातील मजूरांवर अन्याय झाला आहे. मे २०१८ मध्ये येथील १३० मजूरांनी १५ दिवस काम केले आहे. त्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात असून त्या बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे गेला नसल्याचे समजते.
हे काम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे आहे. आपल्याला केलेल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून येथील मजूर ग्रामसेवकाला विनवण्या करीत आहेत. मजुरांच्या मागणीचे देयके सात महिन्याचा कालावधी उलटून देखील पाठविण्यात आलेले नाही. ही बाब संतापजनक असून रोजगार हमी योजनेच्या मूळ उद्देशालाच बाधा आणणारी आहे. या प्रकाराबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही विचारणा करून देखील ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अनेक वेळा मोखाडा पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारून सुद्धा आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली अशी माहिती कुर्लोद जांभूळपाडा येथील रोहयो मजूर राम काळू फुफाने यांनी लोकमतला दिली. तर कष्टकरी संघटनेचे शिवाजी कचरे यांनी प्रशासनाच्या या अनास्थे बाबत आम्ही अनेकदा मुद्दा उपस्थित करुनही त्यावर मार्ग निघत नसल्याच सांगून या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कष्टकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
आम्ही अनेकदा आंदोलना दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु, यावर तोडगा काढला जात नाही. गावातील मजूरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पोटापाण्याच्या या प्रश्नाकडे ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने कोणतेही पाऊल न उचलल्यास कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडले
जाईल असा इशारा कष्टकरी संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
कुर्लोदच्या गावकºयांनी केलेले हे काम रस्त्याचे असून त्या कामाचे संकेतस्थळ बंद असल्याने त्या मजुरांची मजूरी रखडली आहे. वेबसाईट सुरू झाली की त्यांना ती मिळेल.
- रत्तीलाल महाले, ग्रामसेवक, कुर्लोद ग्रामपंचायत