उत्तनच्या मच्छिमारांवर दरोड्याचा गुन्हा
By Admin | Updated: April 23, 2015 23:12 IST2015-04-23T23:09:16+5:302015-04-23T23:12:52+5:30
उत्तनच्या मच्छिमारांनी सातपाटीच्या १४ बोटींवर चढून जीवघेणा हल्ला केला. यात दोघे जखमी झाले. एक कोटीची जाळी व रोख रक्कम लुटून नेल्याची तक्रार

उत्तनच्या मच्छिमारांवर दरोड्याचा गुन्हा
पालघर : उत्तनच्या मच्छिमारांनी सातपाटीच्या १४ बोटींवर चढून जीवघेणा हल्ला केला. यात दोघे जखमी झाले. एक कोटीची जाळी व रोख रक्कम लुटून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात सागरी पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचे सातपाटीच्या मच्छिमारांचे म्हणणे आहे.
सातपाटी गावाच्या समोरील समुद्रात ६५ सागरी मैल अंतरावर विश्वनाथ नथुराम पाटील यांची जय विश्वसाई लक्ष्मी, प्रविण कतरे यांची जय कादंबरी, धनंजय म्हात्रे जय जगदंबा, वासंती म्हात्रे- वसुंधरा, संजय पाटील - जय जगत स्वामिनी, प्रफुल्ल पाटील - जय लक्ष्मी, प्रकाश तरे - भाग्यलक्ष्मी, विकास विठोबा वैती- वैशाली, जयवंत पाटील - ओमकारेश्वर, रमेश पाटील - धनलक्ष्मी, बाळकृष्ण म्हात्रे - साईकृपा, चेतन तांडेल- विभुतीसाई, सुनील म्हात्रे- भाग्यलक्ष्मी, केसरीनाथ पागधरे- कन्याकुमारी या १४ बोटी सकाळी ११ वाजता मासेमारीची तयारी करीत असताना हातात दांडुके, लोखंडी पहार, बीअरच्या बाटल्या, कुऱ्हाडी आदी साहित्यासह उत्तनचे मच्छिमार येत असल्याचे दिसताच बोटी सुरू करून पळ काढल्याचे मच्छिमारांनी सांगितले. काही अंतरावर उत्तन, डोंगरी चौक व पाली आदी भागातील २० ते २५ बोटींनी चौदा बोटींना पकडून मच्छिमारांना मारहाण सुरु केली. यावेळी उत्तनचे मच्छिमारांनी वायरलेस सेट, जीपीएस सेट, होकायंत्र, इलेक्ट्रीक मीटरची तोडफोड केली. यात एक कोटी रुपयांची जाळी, ९०० लिटर डिझेल, रोख रक्कम, दीड लाखाचे मासे चोरून नेल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. मारहाण होत असताना आम्ही काय अपराध केला, अशी विचारणा केली असता आपल्याला मारहाण केल्याचे विभूतीसाई बोटीचे तांडेल भुवनेश्वर निजप यांनी सांगितले. तर मारहाण आणि बोटीतील मासे व जाळी चोरून नेल्याचे जयलक्ष्मी बोटीचे तांडेल प्रफुल्ल पाटील यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुुरुवारी शेकडो मच्छिमार सातपाटी सागरी पोलीस स्टेशनसमोर जमा झाले.
भुवनेश्वर निजप यांच्या तक्रारीवरून उत्तन भागातील ख्रिस्तदान, नोकीया, अनाक, मतदार राजवंश चायना, आदम ख्रिस्तदान, मेनपाल, शिलम आदी बोटींसह अन्य १० ते १५ बोटींवरील लोकांविरुद्ध दरोडा, घातक हत्यारांनी दुखापत पोहचविणे आदी कलमान्वये सातपाटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो झिरो एफ आय आरने मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यामध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)