Corona Virus: रिसॉर्ट मालकांचा व्यवसाय मंदावला; वसईत कोरोना व्हायरसची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:18 PM2020-03-11T23:18:31+5:302020-03-11T23:18:37+5:30

होळीच्या दिवसात होत असे मोठी गर्दी

Resort owners' business slows down; Terror of Corona Virus | Corona Virus: रिसॉर्ट मालकांचा व्यवसाय मंदावला; वसईत कोरोना व्हायरसची दहशत

Corona Virus: रिसॉर्ट मालकांचा व्यवसाय मंदावला; वसईत कोरोना व्हायरसची दहशत

Next

पारोळ : अवघ्या जगाला सध्या कोरोना विषाणूच्या भीतीने ग्रासले आहे. भारतातही महाराष्टÑासह काही ठिकाणी या विषाणूने चांगलीच भंबेरी उडवलेली दिसते. वसई तालुक्याच्या किनारीपट्टीलाही कोरोनाच्या दहशतीचा चांगलाच धक्का बसलेला दिसतो. वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. येथील हॉटेल, रिसॉर्ट मालकांना या कोरोनाच्या दहशतीचा चांगलाच फटका बसला असून त्यांचा धंदा मंदावला आहे.

पूर्वी होळीच्या दिवसात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व्यवसायाला बरकत असे; पण यंदा होळीच्या दिवसात कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याचे रिसॉर्ट मालकांचे म्हणणे आहे.

एरवी वीकेण्ड तसेच अन्य दिवशी गजबजलेली हॉटेल्स, रिसॉर्ट कोरोना दहशतीमुळे ओस पडली आहेत. या ठिकाणी पर्यटक आणि ग्राहक येण्यास धजावत नसल्याने त्यांचा धंदा मंदावला आहे. कोरोना व्हायरसमुळे येथील पर्यटनाला धक्का बसला आहे. पहिल्यांदाच वसईची पश्चिम किनारपट्टी पर्यटकांविना दिसते आहे. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात; पण कोरोनाच्या भीतीने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकच नसल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकही चिंतेत दिसत आहेत.

वसईच्या पश्चिम किनारपट्टीला मिनी गोवा असे संबोधले जाते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथून रोज हजारो पर्यटक या ठिकाणी पिकनिकला येतात. चांगल्या पर्यटनामुळे इतकी वर्षे उत्तम व्यवसाय करणारे हॉटेल, रिसॉर्ट कोरोनामुळे मंदीच्या सावटाखाली गेले आहेत. किनारपट्टीवर पर्यटकांसाठी खास उंट सवारी करणारे उंटवालेसुद्धा पर्यटकांची वाट पाहत आहेत. दिवसाला हजार ते बाराशे रुपये कमावत असताना आता केवळ २०० ते ३०० रुपये कमाई होत असल्याने तेही चिंतेत आहेत. प्रामुख्याने विरार, वसई, येथील अर्नाळा, कळंब, राजोडी, सुरूची बाग, पाचूबंदर, किल्लाबंदर येथे पर्यटकांची गर्दी असते.

वसईत कोरोनाच्या भीतीने पूर्ण रिसॉर्ट व्यवसाय ठप्प झाला असून, होळीच्या दिवसांतही पर्यटकांनी रिसॉर्टकडे पाठ फिरवल्याने रोजचा खर्चही वसूल होत नसल्याने हा व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. - फ्रेडी फरगोज, आनंद रिसॉर्ट मालक

Web Title: Resort owners' business slows down; Terror of Corona Virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.