राजवली पुलाला सा.बां.चा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:37 IST2018-04-14T03:37:52+5:302018-04-14T03:37:52+5:30
वसई तालुक्यातील नवघर पूर्व येथून जाणाऱ्या खाडीवरील नियोजित राजवली-दिवाणमान हा पूल अपूर्णावस्थेत असल्यामुळे राजवली-टिवरी या गावासह परिसरातील अनेक छोट्या पाड्यातील गावक-यांना रोजचा पायी प्रवास करत वसई रोड स्थानक गाठावे लागत आहे.

राजवली पुलाला सा.बां.चा खो
- अजय महाडिक
मुंबई: वसई तालुक्यातील नवघर पूर्व येथून जाणाऱ्या खाडीवरील नियोजित राजवली-दिवाणमान हा पूल अपूर्णावस्थेत असल्यामुळे राजवली-टिवरी या गावासह परिसरातील अनेक छोट्या पाड्यातील गावक-यांना रोजचा पायी प्रवास करत वसई रोड स्थानक गाठावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीन धोरणामूळे पूलाचे काम रेंगाळले असल्याचे वास्तव आहे.
नवघर पूर्व येथील राजवली-दिवाणमान खाडीवर पूल व्हावा अशी गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी आहे. शासनदरबारी सतत पाठपूरावा केल्यानंतर या खाडीवर सा.बां.विभागाकडून पूलाच्या कामास मुहूर्त मिळाला. सा.बां.विभागाकडून पूलाचे काम वर्ष २०१४ ला सुरू करण्यात आले होते. गत चार वर्षात दोंन्ही बाजूंचे गर्डर टाकले गेले आहेत. तर पूलाचे उर्वरीत काम आता बंद करण्यात आले आहे.
या खाडीवर पूर्वीपासून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी लाकडी साकव (लाकडी पूल) होता. सद्या तो एका बाजूने तूटल्यामूळे बंद करण्यात आला आहे. पूर्वी तात्कालीन नगरपंचायत व महापालिका या लाकडी पूलाची नियमीत देखभाल व दुरुस्ती करीत असे. या खाडीच्या पात्रात मोठे सिमेंटचे पाण्याचे पाईप टाकून रस्ता बनवलेला होता. मात्र पावसाळ्यात आलेल्या पूरामूळे पाणी अडले जात असल्यामुळे हे पाईप काढून टाकण्यात आले आहेत.
वास्तविक पूल अठरा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. गेल्या चार वर्षात ग्रामस्थांना तात्पूरता उभारलेल्या चार फूटाच्या लोखंडी पूलावरून प्रवास करावा लागतो आहे. याबाबत शिवसेनेचे वसई नवघर शहर प्रमूख राजाराम बाबर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली असता राजिवली - दिवाणमान खाडीवर बांधण्यात येणारा पूल १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना कालावधी संपूनही अजून पूलाचे काम पूर्ण झालेले नाही.
हा खाडीवरील पूल तयार झाल्यास राजवली-टिवरी या गावातील ग्रामस्थांना जवळचा मार्ग व नवघर पूर्व येथील वाहतूक कोंडीबाबत पर्यायी मार्ग ठरेल. मात्र याबाबत पालिकेचे उदासीन धोरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची कामात दिरंगाई हे मूख्य कारण आहे. सद्या या खाडीवर चैतन्य कंस्ट्रक्शन कंपनीकडून लोखंडी पूल ये जा करण्यासाठी बांधण्यात आला आहे.
हा रस्ता नवघर पूर्व येथील वसई विकासीनी कला विद्यालयाजवळून राजवली-दिवाणमान खाडीवरील पूलावरून जाणार असून तो झाल्यास सातिवली, वालीवसाठी एकदिशा मार्ग झाल्यास नवघर पूर्व येथील वाहतूक कोंडी संपूष्टात येणार आहे. मात्र, पालिका व वाहतूक पोलीसांकडून वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना व सा.बां. विभागाकडून पूलाचे उर्वरीत रखडलेले काम पूर्ण करण्याबाबत अजूनही चालढकल सुरु आहे.
>या प्रकल्पासाठी ३ कोटी १० लाख ७४२ रूपये खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, ठरावीक कालावधीत हे काम पुर्ण न झाल्यामूळे या कामाच्या मुदत वाढीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
- आर. एच. जगदाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग