पावसाळी रानभाज्या होताहेत दुर्मिळ
By Admin | Updated: July 7, 2015 22:26 IST2015-07-07T22:26:37+5:302015-07-07T22:26:37+5:30
पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत.

पावसाळी रानभाज्या होताहेत दुर्मिळ
कासा : पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत. मात्र ग्रामिण भागात वाढत्या बांधकामामुळे या रानभाज्या सध्या दुर्मिळ झाल्याचे चित्र असून रानावनात दिसणाऱ्या रानभाज्याही जंगलाच्या ऱ्हासामुळे आता दिसेनाशा झाल्या आहेत.
पावसाळ्यात रानात झाडी झुडुपात शेवली, कोलीभाजी, अळू, कोरल, आफीम, घोळू, कुरडू, बाफळी, शेवगाचा पाला, माठभाजी आदी पालेभाज्या, कर्टूले, पेढरं, काकडं, टेटवी, शिंद (बांबु), अभईच्या शेंगा या फळभाज्या तर कंद, कडुकंद (वली), अळूचे कंद, करांदे, कणक, कसऱ्या आदी कंदभाज्या उगवतात. यापैकी बऱ्याच वनस्पती औषधी गुणधर्माच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्या मानवी आरोग्यासाठी गुणकारी असतात. मात्र आता त्या दुर्मिळ होऊ लागल्याने खेड्या पाड्यातही त्याचा वापर आहारात कमीच झाला आहे.
बांबुच्या झाडाच्या जमिनीलगत येणारे नवीन अंकुर भाजीत वापरले जात असून त्यास ग्रामीण भागात शिंद संबोधले जाते. बांबुना काप देवून ती तयार केली जाते. बाफळी ही पालेभाजी जंगलातील कपारीत एखाद्या ठिकाणीच आढळत असून ती गुणकारी आहे. त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. तर टेटवी, करंटोळी, पेढरं, कुरडू हे झाडी झुडूपातही आढळतात. कडूकंदापासून वली बनवितात मात्र त्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्या राखाडी टाकून धुवून घेतात. रानमाळावर उगवणारी आळींब या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र रानभाज्या दिवसेंदिवस दुर्मिळ होत जात आहेत. (वार्ताहर)