बससेवेसाठी जनआंदोलन आक्रमक, ५ डिसेंबरला एसटीची बससेवा पुर्णपणे बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:14 IST2017-12-03T02:14:17+5:302017-12-03T02:14:46+5:30
मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिका वसईकरांना बससेवा देत नाही. ग्रामीण भागातील बससेवा पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत पुन्हा सुरळीत करावी, अन्यथा वसईत उग्र आंदोलन होईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आहे. यात वसईच्या प्रांताधिका-यांनी मध्यस्थी केली आहे.

बससेवेसाठी जनआंदोलन आक्रमक, ५ डिसेंबरला एसटीची बससेवा पुर्णपणे बंद होणार
वसई : मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिका वसईकरांना बससेवा देत नाही. ग्रामीण भागातील बससेवा पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत पुन्हा सुरळीत करावी, अन्यथा वसईत उग्र आंदोलन होईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आहे. यात वसईच्या प्रांताधिका-यांनी मध्यस्थी केली आहे.
एसटी महामंडळाने वसई आणि नालासोपारा एसटी डेपोतून सुटणाºया शहरी बससेवा टप्याटप्याने बंद करण्यास सुरुवात केली आहे. येत्या ५ डिसेंबरला एसटीची बससेवा पुर्णपणे बंद होणार आहे. बंद असलेल्या मार्गावर वसई विरार महापालिकेने बससेवा सुरु केल्या आहेत. मात्र, परिवहनची बससेवा एसटीच्या शेड्यूल्डनुसार नसल्याने प्रवाशी संतप्त झाले असून जनआंदोलन समितीने बससेवा पूर्ववत सुरु व्हावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एसटीने विद्यार्थी आणि प्रवाशांना मासिक पासेसही बंद केले असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याकडे आंदोलनाच्या नेत्यांनी लक्ष वेधले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वसईचे प्रांताधिकारी दीपक क्षिरसागर यांनी एक बैठक बोलावली होती. त्यात वसई एसटी डेपो मॅनेजर ठाकरे, नालासोपारा एसटी डेपो मॅनेजर भोसले, विभागीय निरीक्षक चौधरी, परिवहन ठेकेदाराचे प्रतिनिधी हेमंतकुमार वझे यांच्यासह जनआंदोलन समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, डॉमणिका डाबरे, विनायक निकम, प्रफुल्ल ठाकूर, जॉर्ज फरगोज, विन्सेंट परेरा, एव्हरेस्ट डाबरे, जितू मेहेर, मयांक शेठ हजर होते.
सेवा देणे बंधनकारक
हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि महापालिकेच्या परिवहन यांना वसईत प्रवाशी सेवा देणे बंधनकारक आहे.
मात्र, दोघांनीही हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचा आरोप याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी केला आहे.