विकासाचे नियोजन करताना संस्कृतीची ओळख जपणार
By Admin | Updated: August 15, 2015 22:44 IST2015-08-15T22:44:42+5:302015-08-15T22:44:42+5:30
आपल्या नवनिर्मित पालघर जिल्ह्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करून विकासाचे नियोजन करताना इथल्या संस्कृतीची ओळख कायम राहावी,

विकासाचे नियोजन करताना संस्कृतीची ओळख जपणार
पालघर : आपल्या नवनिर्मित पालघर जिल्ह्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करून विकासाचे नियोजन करताना इथल्या संस्कृतीची ओळख कायम राहावी, असा माझा प्रयत्न असेल असे उद्गार आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर येथे काढले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, दत्ता भडकवाड, मनीषा पिंगळे इ.सह उपस्थित मान्यवरांनी ध्वजाला वंदन केले.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा तळमळीने काम करीत असून या यंत्रणेच्या सहकार्याने सर्व स्तरांवरचा विकास करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला असून पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी भागांतील ५१ गावांमध्ये कामे सुरू असून १ कोटी ७५ लाख लीटर इतका अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई दूर होऊन वर्षभर शेतात पिके घेणे शक्य होणार असल्याने स्थलांतरासारखा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण निधीपैकी पाच टक्के निधी दरवर्षी ग्रामपंचायतीकडे आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने पेसा कायद्यांतर्गत घेतला असल्याचे सांगून गावागावांत पायाभूत सुविधा, आरोग्य, रस्ते, शिक्षण या चांगल्या सुविधा नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तलासरी : तलासरीत भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तलासरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार गणेश सांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीसांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात तलासरीतील शाळा कॉलेजचे विद्यार्थ्यांबरोबर डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आ. पास्कल धनारे, खा. चिंतामण वनगा, सभापती वनशा दुमाडा, उपसभापती भानुदास भोये, तसेच जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.