प्रतिज्ञापत्र सादर करीत नाहीत, तोपर्यंत वसई-विरार महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:41 IST2020-10-28T00:40:19+5:302020-10-28T00:41:51+5:30
Vasai-Virar Municipal Corporation election News : दोन वेळा सांगूनही राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही, तोपर्यंत वसई-विरार महापालिकेची निवडणूक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

प्रतिज्ञापत्र सादर करीत नाहीत, तोपर्यंत वसई-विरार महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती
वसई : राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही, तोपर्यंत वसई-विरार शहर महानगरपालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची एकूणच प्रकिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.
समीर वर्तक यांनी वसई-विरार महापालिका प्रशासन तथा निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेबाबत दोष, त्रुटी व काही सूचनाही केल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाने १७ पैकी केवळ एकच हरकत मान्य करीत इतर सर्वच्या सर्व हरकती फेटाळून लावल्याने वर्तक यांनी महापालिकेसह राज्य निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. उच्च न्यायालयात पहिली सुनावणी दि. १५ ऑक्टोबरला, दुसरी सुनावणी दि. २२ ऑक्टोबरला पार पडली, मात्र दोन्ही वेळी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी गैरहजर राहिले, किंबहुना निवडणूक आयोगाने आमची प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे सांगितले, तर नंतर आम्हाला नोटीसच मिळाल्या नाहीत, असा युक्तिवाद केला, मात्र याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी सर्व प्रतिवादींना नोटिसा ई-मेलद्वारे पाठवल्याचे पुराव्यासह उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
दोन वेळा सांगूनही प्रतिज्ञापत्र सादर नाही
दोन वेळा सांगूनही राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही, तोपर्यंत वसई-विरार महापालिकेची निवडणूक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.