परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई
By धीरज परब | Updated: February 29, 2024 20:21 IST2024-02-29T20:21:12+5:302024-02-29T20:21:16+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात.

परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई
मीरारोड- भाईंदरच्या चौक जेट्टी येथे म्यानमार देशातील ८ रोहिंगे सापडल्याने खळबळ उडाली असून मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी परदेशी नागरिकांना आश्रय व सुविधा देण्यास १ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान मनाई आदेश लागू केला आहे. तसेच त्यांची माहिती न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बांग्लादेशी व नायजेरियन नागरिक बेकायदा वास्तव्य करताना तसेच अमली पदार्थ आदींचा व्यवसाय करताना आढळून येत असतात. परंतु भाईंदरच्या चौक जेट्टी येथे म्यानमार देशातील ८ रोहिंगे हे उघड्यावर मस्तपणे गप्पा मारताना आढळून आल्या नंतर खळबळ उडाली.
लोकमतने याबाबत गुरुवारी बातमी दिल्यावर मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश जारी केला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात. यामुळे काही असामाजिक तत्वांना मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांची ओळख आणि उपस्थिती लपवुन राहण्याची संधी प्राप्त होते. त्यावर आळा घालणेकामी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित केला आहे .
आदेशानुसार बोर्डिंग हाऊस, क्लब, विश्रामगृहे (खासगी कंपनीचे विश्रामगृहांसह), पेयींग गेस्ट हाऊस, होम स्टे सुविधा, भाडेतत्वावर मिळणारी निवासस्थाने, घरे , सदनिका , बंगले, चाळ इत्यादी ठिकाणी परदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास २४ तासांच्या आत पोलिसांना त्याची माहिती मालक - चालकांनी द्यायची आहे.
तसेच रुग्णालये, दवाखाने, दुकाने , उपहारगृहे, सराई आणि जहाज व बोटी आदी आस्थापनां मध्ये परदेशी नागरिक आल्यास त्याची माहिती सुद्धा संबंधित चालक - मालक , व्यवस्थापक यांना नजीकच्या पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक करण्यात आले आहे . सदर आस्थापणांमध्ये सध्या परदेशी नागरीक वास्तव्यास असल्यास त्याची माहिती सदरचा मनाई आदेश पारित झाल्यापासुन २४ तासाच्या आत पोलीसांना द्यावा लागणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे व इतर संबंधित कायदयांप्रमाणे कायदेशीर कारवाई आणि शिक्षेस पात्र ठरणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.