विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रसिद्ध करण्यास पोलिसांची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 22:31 IST2025-09-02T22:31:41+5:302025-09-02T22:31:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित ...

विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रसिद्ध करण्यास पोलिसांची बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित करण्यास बंदी आणली आहे. शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशा नुसार यंदा ६ फूट पर्यंतच्या मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. तर ६ फूट पेक्षा उंच मुर्त्यांची नैसर्गिक जलस्रोत मध्ये विसर्जन केल्यावर त्या पुन्हा काढून घेण्याचे आदेश आहेत.
कृत्रिम तलावाची उभारणी, मुर्त्यांची हाताळणी, त्या संरक्षित व मनुष्य प्रतिबंधित भागात ठेवणे, त्याची वाहतूक व पुढील नियोजन देखील गोपनीय पद्धतीने आवश्यक असते. मात्र कृत्रिम तलाव व व्यवस्थेवरून काहींनी फोटो - व्हिडीओ काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. तेढ - तणाव निर्माण करण्यासह लोकांच्या धर्मी भावना दुखावणे, भडकावणे व चिथावणी देण्याचा प्रयत्न करणे सुरु होते. त्यातून सार्वजनिक सुरक्षितता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती.
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाने २ सप्टेंबर रोजी मनाई आदेश जारी केला आहे. उपायुक्त मुख्यालय अशोक वीरकर यांनी जारी केलेल्या आदेशा नुसार, काही अर्ध्या विरघळलेल्या मुर्ती किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात अश्या मुर्तीचे फोटो घेतात. महानगरपालिकेचे कर्मचारी मुर्ती गोळा करतानांचे फोटो घेतात आणि धार्मिक भावना दुखावतील आणि सार्वजनिक शांतता आणि भावना दुखावतील अशी छायाचित्रे किंवा चलचित्र प्रकाशित, प्रसारित करतात.
ते प्रतिबंधित करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर तरंगत्या मुर्तीचे किंवा अर्धवट तरंगत्या मुर्तीचे फोटो काढू नयेत आणि ते प्रकाशित किंवा प्रसारित करु नये असे बजावले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे. हा आदेश दि. १४ सप्टेंबर पर्यंत मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये लागू राहील.आदेशामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे असे स्पष्ट केले आहे.
मुंबईत विसर्जित केलेल्या गणेश मुर्त्या ह्या समुद्र किनारी पुन्हा वाहून येतात. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्तालय गेली अनेक वर्षे अश्या प्रकारची बंदी आणत असते.