वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:37 IST2025-07-21T10:37:17+5:302025-07-21T10:37:34+5:30

पर्यटकांना चिंचोटी, देवकुंडी यांसारखे धबधबे आणि ओढ्यांच्या ठिकाणी मनाई करण्यासाठी येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.

Police ban on tourist spots in Vasai; Tourists barred from visiting Chinchoti, Devkundi waterfalls | वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव

वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव

नालासोपारा : पाऊस सुरू झाल्यापासून वसईतील पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. अनेकदा अतिउत्साहामुळे त्यांच्याकडून जीवाला धोका होईल, अशी कृत्ये केली जातात. हे लक्षात घेऊन अतिवृष्टीत या पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडू नये, यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने मनाई आदेश काढले आहेत.

नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामन, चिंचोटी परिसरात अनेक हौशी पर्यटक फिरायला येतात. मात्र, या भागातील पर्यटन पूर्णपणे असुरक्षित असून, येथे दरवर्षी पाण्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यादृष्टीने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने मनाई आदेश लागू करत येथे जाणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच दिला आहे. याबाबत जनतेला वेळोवेळी आवाहन करण्याबरोबरच दररोज पोलिसांचा बंदोबस्तही राहणार आहेत. तसेच मनाई आदेशाचे फलक या परिसरात लावण्यात आलेले आहेत.  या मनाईमुळे पर्यटकांना येथून परत जावे लागते आहे. त्यामु‌ळे पालघर, डहाणू येथील पर्यटनस्थळांकडे कल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पर्यटकांना चिंचोटी, देवकुंडी यांसारखे धबधबे आणि ओढ्यांच्या ठिकाणी मनाई करण्यासाठी येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. त्याबाबत रीतसर पर्यटकांना आवाहन केले जात आहे. 
विजय कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नायगाव पोलिस ठाणे.

पर्यटनस्थळांवर जीवघेणा सेल्फी खेळ
धोकादायक पद्धतीने सेल्फी घेण्यासाठी स्टंट करताना अनेकांचा पर्यटनस्थळांवर मृत्यू झालेला आहे. धोकादायक ठिकाणी पर्यटन करण्यास मनाईचे सूचना फलक लावलेले असतानाही अनेक पर्यटक आपल्या जिवावर बेतेल, असे स्टंट करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे.

पर्यटकांचा हिरमोड
वसई तालुक्यातील तुंगारेश्वर, चिंचोटी हे धबधबे पर्यटकप्रिय आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यातील डोंगराळ भागातील या धबधब्यावर जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Police ban on tourist spots in Vasai; Tourists barred from visiting Chinchoti, Devkundi waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.