नालासोपाऱ्यात पोलिसांची नायजेरियनवर धडक कारवाई; धरपकड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:19 IST2019-11-18T23:19:35+5:302019-11-18T23:19:37+5:30
सुमारे ५० ते ६० नायजेरियनांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कागदपत्रांचीही तपासणी

नालासोपाऱ्यात पोलिसांची नायजेरियनवर धडक कारवाई; धरपकड सुरू
नालासोपारा : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत सोमवारी पहाटे तुळींज आणि नालासोपारा पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, क्यूआरटी पथक, दंगल पथक, होमगार्ड अशा मोठ्या पोलीस फौजफाट्यासह प्रगती नगर परिसरात जाऊन नायजेरियन नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ५० ते ६० नायजेरियन नागरिकांना तुळींज पोलीस ठाण्यात आणून भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही याची चौकशी करून तपास करत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या नेतृत्वाखाली तुळींजचे पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील आणि नालासोपारा पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, क्यूआरटी पथकाचे २५ कर्मचारी, दंगल पथकाचे २५ कर्मचारी, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांचे १० कर्मचारी, १० ते १५ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त घेऊन प्रगती नगर परिसरातील जय माता दि अपार्टमेंट, केडीएम अपार्टमेंट, बसेरा अपार्टमेंट, तारा अपार्टमेंट आणि साई नयन अपार्टमेंटमध्ये जात पोलिसांनी येथे राहत असलेल्या ५० ते ६० नायजेरियन महिला आणि पुरुषांना ताब्यात घेऊन तुळींज पोलीस ठाण्यात आणले. काही नायजेरियन घरे उघडत नसल्याने पोलिसांनी दरवाजे तोडून यांना घराबाहेर काढले आहे. या सर्वांकडे योग्य ती कागदपत्रे, पासपोर्ट आहे का याची चौकशी केली जात असल्याचे उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले.
परदेशी भाडेकरूची माहिती देणे बंधनकारक
नालासोपाºयात राहणाºया नायजेरियन नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत. परदेशी नागरिकांची शहानिशा करूनच त्यांना घर, दुकाने हॉटेल तसेच जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांचा रीतसर भाडे करार करून नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देऊ नये असे आदेश पालघर पोलिसांनी दिले आहेत. या नियमांचा भंग झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.