दहा महिन्याच्या चिमुकलीने खेळताना पकडला विषारी साप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 11:59 IST2019-07-28T08:32:18+5:302019-07-28T11:59:23+5:30
लहान मुलं खेळताना काय काय हातात घेतील याचा काही नेम नाही, मात्र असाच काहीसा हृदयद्रावक प्रकार वसईच्या फादरवाडीत घडला आहे.

दहा महिन्याच्या चिमुकलीने खेळताना पकडला विषारी साप !
वसई- लहान मुलं खेळताना काय काय हातात घेतील याचा काही नेम नाही, मात्र असाच काहीसा हृदयद्रावक प्रकार वसईच्या फादरवाडीत घडला आहे. एका दहा महिन्यांच्या चिमुकलीने खेळताना चक्क घरात शिरलेला विषारी साप हातात पकडला. मात्र त्याचवेळी या विषारी सापाने या चिमुकलीला दंश केला. वसईतील फादरवाडी येथील एका बैठ्या घरात ही घटना घडली आहे.
श्रीयांग झंकर ढोली, असं या चिमुकलीचे नाव असून ती अवघ्या दहा महिन्यांची आहे.
सविस्तर माहितीनुसार, शनिवारी सकाळी 7च्या सुमारास फादरवाडी येथील बैठ्या घराच्या दरवाजा जवळ श्रीयांग खेळत होती,
दरम्यान पावसामुळे एक विषारी साप घरात शिरला तेव्हा श्रीयांगने खेळणं समजून या सापाला चक्क हातात पकडले, मात्र त्यानंतर सापाने तिच्या हाताला पीळ मारून दंश केला. त्यावेळी श्रीयांग रडायला लागल्याने आतील खोलीत असलेल्या आईने तिचा आवाज ऐकून तिच्याजवळ धाव घेतली असता हाताला पीळ मारलेल्या श्रीयांगच्या हातातील साप झटकून तिला तिच्या आईने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या घटनेत तिच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू झाल्याने त्या चिमुकलीचे प्राण बचावले असून, आता ही चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.