- मंगेश कराळे नालासोपारा - भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
अधिक माहितीनुसार, संध्याकाळी वाजताच्या सुमारास प्रशांत ब्रजेशकुमार राणा आणि दिव्यांश महेश शर्मा हे दोघे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. अंधार पडल्या नंतरही सदर मुले येथील खडकांमध्ये बसले होत. यावेळी भरतीचे पाणी वाढल्याने अंदाज नसल्यामुळे ही दोन तरुण समुद्राच्या पाण्यात अडकले होते. किनाऱ्यावर अंधार पसरला होता. त्यामुळे मदतीसाठी कुणीतरी येण्याच्या अशा मावळल्या होत्या.
अशावेळी येथील तैनात जीव रक्षक हितेश तांडेल यांनी वरिष्ठांना संपर्क साधून बोट मागवली. परंतु, बोट घेण्यास उशीर लागणार असल्याने त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा येथील जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी मदतीसाठी कळंब येथील नवनीत निजाई यांना संपर्क साधुन बोटीची तजवीज केली. दरम्यान मनपाचे अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीच जीव रक्षक हितेश तांडेल यांनी दोन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले होते. अंधारामुळे या रेस्क्यू मधे काहीही झाले असते अशी माहिती तांडेल यांनी दिली. यानंतर वसई पोलिसांनी संबंधितांना भुईगांव चौकीस नेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना त्यांच्या पालकांना सुपूर्द केले.
विकेंडसाठी या भागात अनेक तरुण-तरुणी पर्यटक दाखल होत असतात अंधार पडल्यानंतरही अनेक जण समुद्रात पोहोण्यासाठी उतरतात. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अप्रिय घटना घडत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्नाळा ते भुईगाव या सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्याला केवळ नऊ जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे मनुष्यबळ तुटपुंजे असून जीव रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.