वसई किल्ल्यातील भुयार फक्त ५५३ फूट लांंब
By Admin | Updated: March 23, 2017 01:15 IST2017-03-23T01:15:16+5:302017-03-23T01:15:16+5:30
मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील भुयाराबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट अफवांना उधाण आलेले असले तरी

वसई किल्ल्यातील भुयार फक्त ५५३ फूट लांंब
शशी करपे / वसई
मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील भुयाराबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट अफवांना उधाण आलेले असले तरी हे भुयार फक्त ५५३ फूट लांब असल्याचे इतिहास तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर हे भुयार अत्यंत धोकादायक असून त्यात विषारी साप-विंचवांचा वावर असल्याने भुयाऱ्यात जाणाऱ्यांनाही सावध केले आहे.
वसई किल्ल्यातील भुयार शिवकालिन असून ते घोडबंदर किल्ला, अर्नाळा किल्ला आणि गिरीज येथील हिरा डोंगरातील दत्तमंदिराजवळ निघते, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर पसरल्या आहेत. त्यामुळे दुर्ग आणि इतिहासप्रेमींमध्ये गैरसमज पसरला आहे. त्यातून दुर्गप्रेमी उत्सुकतेपोटी याठिकाणी येत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र, ही अफवा असल्याचे इतिहास तज्ञांकडून सांगण्यात आले.
पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची १६ व्या शतकात बांधणी केली. त्यावेळी किल्ल्यातील एका बुरुजातून दुसऱ्या बुरुजात जाण्यासाठी ५५३ फूट लांबीचे भुयार बांधण्यात आले आहे. यातून अवघ्या दहा मिनिटात दुसऱ्या भुयारात पोचता येते. चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला. त्याला तब्बल २७८ वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे भुयार शिवकालीन नसल्याचेही इतिहास तज्ञ श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.