No place to meet police station! | पोलीस ठाण्याला मिळेना जागा!
पोलीस ठाण्याला मिळेना जागा!

नालासोपारा : नालासोपारा शहरातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ५ मार्च २०१५ रोजी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. घाईघाईत तयार करण्यात आलेले सदरचे पोलीस ठाणे हे चक्क एका गटारावर उभारण्यात आले होते. मात्र तब्बल पाच वर्षे होऊन सुद्धा आजही पोलीस ठाणे गटारावरच उभे असून ते स्थलांतर करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. परंतु शोधाशोध करूनही तुळींज पोलीस ठाण्याला अद्याप जागा उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


एकीकडे नालासोपारा शहरात शाळा, गार्डन, हॉस्पिटल्स यासाठी आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून पोलीस ठाण्याला डीपी आराखड्यात आरक्षित जागाच ठेवण्यात आलेली नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गटारावर उभारण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यात पावसाळ्यामध्ये गटाराचे पाणी तुंबून परिसर जलमय होतो. वसई तालुक्यात तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता हाती असतानादेखील नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्याकरिता साधी जागा उपलब्ध करून देता येत नसेल तर मग सत्तेचा काय उपयोग आहे? असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तुळींज पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून १५० हून अधिक जणांचा स्टाफ काम करीत असून त्यांना अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे. पोलीस ठाणे एका गटारावर उभे असल्यामुळे गटाराच्या दुर्गंधीमुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आजारपणामुळे अनेकवेळा रजेवर गेले असल्याची माहितीही समोर येत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली, मात्र आता तर सदर पोलीस ठाण्याचेच अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

कुणी जागा देता का जागा...
नालासोपारा शहराला विभागून बनविण्यात आलेल्या तुळींज पोलीस स्टेशनला ‘कोणी जागा देता का जागा’ अशी म्हणण्याची वेळ आता पोलिसांवर येऊन ठेपली आहे. नालासोपारा पूर्वेकडे मनपा हद्दीतील किंवा नगररचना (डीपी) प्लानमध्ये पोलीस स्टेशनला आरक्षित जागा ठेवण्यात आलेली नाही. सुरक्षा करणारे आणि कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी अहोरात्र मेहनत करणाºया पोलिसांसाठी साधी पोलीस स्टेशन बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, यापेक्षा पोलिसांसाठी मोठे दुर्दैव काय?

गटारावर उभे आहे पोलीस ठाणे
नालासोपारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी हे शहर दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागण्यात आले. तुळींज पोलीस ठाणे हे चक्क गटारावर उभे करून चालू करण्यात आले होते. पण गटारावर उभारलेल्या पोलीस ठाण्यामुळे काम करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा तसेच घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे पोलीस ठाणे ठाणे चक्क गटारावर उभे असल्याने गटाराची साफसफाई करण्यासाठी मनपा कर्मचाºयांना मधोमध असलेली झाकणे उघडावी लागतात. ही झाकणे साफसफाईसाठी उघडल्यावर उग्र दुर्गंधीमुळे पोलीस स्टेशनला थांबण्यास खूप त्रास होत आहे. पोलिसांच्या आरोग्यावरही त्याच्या परिणाम होत आहे.

Web Title: No place to meet police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.