शहानिशा केल्यानंतरच मतदारयादीतून नावे वगळावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:40 IST2020-11-23T23:39:50+5:302020-11-23T23:40:14+5:30
राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयाद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

शहानिशा केल्यानंतरच मतदारयादीतून नावे वगळावीत
ठाणे : जिल्ह्यातील मतदारयादीमध्ये समाविष्ट असलेले मयत मतदार, दुबार नाव असलेले मतदार, स्थलांतरितांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही आदी करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे मतदारयादीतून वगळावी. मतदारयाद्यांच्या विशेष पुनरिक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्राधान्यक्रमाने करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यातील ''''छायाचित्रांंसह मतदारयाद्यांच्या विशेष पुनरिक्षण'''' कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत सोमवारी केल्या.
राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयाद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, मतदारयाद्यांमधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात. नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करावेत आदी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्पणा सोमाणी आणि जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचे नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विभागीय कोकण आयुक्तांची मतदार निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार मिसाळ यांनी मतदारयाद्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आढावा, मतदारछायाचित्र त्रुटी, मतदारांचे अचूक ओळखपत्र, निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रारी आदींचा विषयनिहाय आढावा घेतला.