Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात आईने मुलीची हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपाऱ्यात एका पाच वर्षाच्या चिमुकलीला तिच्याच भावाने संपवल्याचे खळबळजनक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करणारा भाऊ केवळ १३ वर्षांचा आहे. क्षुल्लक कारणावरुन आत्तेभावाने पाच वर्षाच्या बहिणीला संपवलं. सीसीटीव्हीमधून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. सीरियल किलरशी संबंधित हिंदी चित्रपट पाहून मुलाने पाच वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आलं.
नालासोपारा परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सहा वर्षांच्या चुलत बहिणीची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह जवळच्या टेकडीवर आढळून आला. आधी तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचण्यात आले. कुटुंबातील लोक चुलत बहिणीवर जास्त प्रेम करतात, आपल्यावर तेवढं प्रेम करत नाही असा समज मुलाला होता. याच कारणामुळे अल्पवयीन मुलाने चुलत बहिणीची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजता श्रीराम नगर टेकडीवर मुलीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी नालासोपारा येथून १३ वर्षीय आत्तेभावाला ताब्यात घेतले. कुटुंबातील प्रत्येकजण बहिणीचे जास्त लाड करत असल्याचे मुलाला वाटत होतं. याच रागातून त्याने बहिणीची हत्या केली. शनिवारी संध्याकाळी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेतला पण ती सापडली नाही. पोलिसांकडे हे प्रकरण जातात सीसीटीव्ही तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा मुलीला कुठेतरी घेऊन जाताना दिसत होता. त्यानंतर पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुलाने बहिणीला मारल्याचे पोलिसांना सांगितले.
अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक श्रीराम नगर टेकडीवर पोहोचले. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मुलीचा मृतदेह सापडला. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा रमन राघव २.० या हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यानंतर मुलाने बहिणीचा गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिचा चेहरा दगडाने ठेचला.