नागपंचमी दिनी आठ फुटी अजगराला मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:33 IST2018-08-15T15:22:38+5:302018-08-15T15:33:39+5:30
घटनास्थळाहून नर जातीच्या आठफुट लांब आणि 10 किलो अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

नागपंचमी दिनी आठ फुटी अजगराला मिळाले जीवदान
डहाणू/बोर्डी - नागपंचमी दिवशी आठ फूट अजगराला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. सजग शेतमजूर आणि तत्पर पोलीस कर्मचाऱ्यामुळे हे शक्य झाल्याचे प्राणिमित्रांनी ''लोकमत''ला सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी डहाणूतील आशागड येथील बेज्जन पटेल यांच्या चिकुवाडीत गवत कापणाऱ्या आदिवासी मजुरांना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आठ फूट लांबीचा अजगर आढळून आला. काही काळ काम थांबविण्यात आले.
परंतु त्यांनी अडथळा आणणाऱ्या अजगराला इजा पोहचवली नाही. ही माहिती परिसरात पसरली. दरम्यान आशागड पोलीस ठाण्याचे कर्मचारी इंदर नानू भुयाळ यांना ही घटना कळताच, त्यांनी वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संघटनेशी संपर्क साधला. त्यावेळी एरिक ताडवाला, पुर्वेश तांडेल या सर्पमित्रांनी घटनास्थळाहून नर जातीच्या आठफुट लांब आणि 10 किलो अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
मागील आठ-दहा वर्षात या प्राणीमित्र संस्थेने सर्प जनजागृती विषयीचे काम खेडोपाड्यात सुरु केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जनतेमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य दिन आणि नागपंचमीच्या औचित्यावर सामान्य माणूस व शासकीय कर्मचारी सर्प संवर्धनाकरिता सजग झाला आहे. तालुक्याच्या पश्चिम घाटातील वन आणि वन्यजीव याकरिता हे पोषक वातावरण निर्माण झाल्याचे समाधान सर्पमित्रांकडून व्यक्त करण्यात आले.