डहाणुतील घोर नृत्याला मुंबईतही प्रतिसाद; गुजराती भाषिक समाजात प्रतिष्ठा लाभलेलं नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 19:52 IST2019-10-27T19:52:10+5:302019-10-27T19:52:30+5:30

घोर हे पारंपरिक वाद्य असून लोखंडी सळईच्या रिंगणात घुंगरू गुंफुन निर्मिलेले वाद्य हाताच्या मुठीत घेऊन वाजविले जाते.

Mumbai also responds to the ghor dance of Dahanu; Dance that has a reputation in Gujarati speaking society | डहाणुतील घोर नृत्याला मुंबईतही प्रतिसाद; गुजराती भाषिक समाजात प्रतिष्ठा लाभलेलं नृत्य

डहाणुतील घोर नृत्याला मुंबईतही प्रतिसाद; गुजराती भाषिक समाजात प्रतिष्ठा लाभलेलं नृत्य

- अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात  दिवाळीनिमित्त घोर हा नृत्य महोत्सव डहाणू तालुक्यात धनत्रयोदशी ते बलिप्रतिदा या दिवशी साजरा केला जातो. येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात या नृत्य महोत्सवाला मानाचे स्थान आहे. यावर्षी पहिल्यांदाच मुंबईत हे नृत्य सादर केले, त्याला शहरी नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

घोर हे पारंपरिक वाद्य असून लोखंडी सळईच्या रिंगणात घुंगरू गुंफुन निर्मिलेले वाद्य हाताच्या मुठीत घेऊन वाजविले जाते. हा पुरुषप्रधान समूह नाचाचा प्रकार जोडीदाराच्या साह्याने घोरीच्या तालावर दोन ते तीन पद्धतीने फेर धरून नाच केला जातो.  डोक्यावर फेटा, अंगात बणीयान घातल्यानंतर छातीवर लुगड्यांच्या साह्याने नक्षीदार विणकाम करून त्यावर झेंडू फुलांच्या माळांनी पुरुषाला सजवलं जातं. कमरेला घुंगरू आणि पांढऱ्या धोतरामुळे व्यक्तिमत्व रुबाबदार दिसते. तर डोळ्यात काजळ घातल्याने सौंदर्‍यात भर पडते.

एका हातात दांडिया आणि  दुसर्‍या हातात मोरपंखाचा गुछा असतो, त्यांना घोरया म्हणतात. 16 वर्ष वयापासूनचे युवक त्यामध्ये सहभागी होतात. याकरिता शिक्षण, नोकरी सांभाळून गणेशोत्सव संपल्यानंतर ते दिवाळीपर्यंत रात्रीच्या काळात सराव करतात. तर बगळी( 8 ते 10 फुट उंच बांबूच्या टोकावर कापडाने बनवलेली बगळ्यांची जोडी) मध्यभागी धरली जाते. कवया(गायक) पारंपरिक गाण्याच्या सुरावटीवर हा नाच केला जातो. कवया गाणे गाताना गणपती, राम-कृष्ण आणि ग्रामदैवतांची स्तुतीपर कवण गातो. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी राजवटी विरुद्ध स्वकीयांना लढण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही प्रेरित करण्याकरिता कवया शाहिरांची भूमिका बजावत होते. 

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी मंडली मातेच्या(सरस्वती देवीच्या) विधिवत पूजेने घोर नृत्योत्सवाला प्रारंभ झाला आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेला रात्री घोर नृत्योत्सवाची सांगता होते. समजबांधवाच्या अंगणात, मंदिर आणि ग्रामदैवतं आदी. ठिकाणी नाच केला जातो. सीमा भागातील डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि आगर या गावांमध्ये हा पारंपरिक नृत्यप्रकार आजही आपली सुवर्ण परंपरा टिकवून आहे.  गावतील बाबुराव जोंधळेकर, संदेश गोंधलेकर हे कवये पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.  

Web Title: Mumbai also responds to the ghor dance of Dahanu; Dance that has a reputation in Gujarati speaking society

टॅग्स :palgharपालघर