पाणीटंचाईने होरपळतो आहे मोखाडा तालुका
By Admin | Updated: March 29, 2016 03:02 IST2016-03-29T03:02:51+5:302016-03-29T03:02:51+5:30
संपुर्ण तालुका पाणीटंचाईने होरपळत असून भीषण पाणीटंचाईचे संकट मोखाडावासिंयाना समोर येऊन ठाकले आहे. जानेवारी महिना संपताच आदीवासी बापडे घोटभर पाण्यासाठी वणवण

पाणीटंचाईने होरपळतो आहे मोखाडा तालुका
- रवींद्र साळवे, मोखाडा
संपुर्ण तालुका पाणीटंचाईने होरपळत असून भीषण पाणीटंचाईचे संकट मोखाडावासिंयाना समोर येऊन ठाकले आहे. जानेवारी महिना संपताच आदीवासी बापडे घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करायला सुरुवात करतात. यामुळे पुढे येणाऱ्या एप्रिल - मे महिन्यात या भीषण पाणीटंचाईला कसे सामोरे जायच असा प्रश्न आदिवासी समोर निर्माण झाला आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना एक महिन्याच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर प्रशासनाने १७ गावपाड्यांसाठी सात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील किनिस्ते, ठाकुरपाडा, लोहारपाडा, दुधगाव, बनाचीवाडी, ठोळपाडा, जांभळीचापाडा, घोसाळी, राजीव नगर, निळमाती यांच्यासह पंधरा पेक्षा अधिक गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. परतु अद्यापही तरी या गावपाडयाना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही यामुळे कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले असल्याचे सांगितले. परंतु अजून पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. कायदा काय म्हणतो... टंचाईग्रस्त गावपाड्यांची मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पहाणी करुन २४ तासाच्या आत पाणी पुरवठा करणे बंधनकारक आहे. तसेच गेल्या वर्षी टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदाराना दिले होते. तसेच टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना असताना पाणी टंचाईनेचे प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे परंतु तरी देखिल अजुनही टँकरने पाणीपुरवठा झालेला नाही.
१७ गावपाड्यासाठी सात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावपाड्याचे प्रस्ताव मंजूरसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले आहेत. लवकरच या गावपाड्याना टँंकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच टँँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार वरिष्ठाकडून प्राप्त झालेले नाही. - जयराज सूर्यवंशी, तहसीलदार,
मोखाडा निळमाती गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन ते तीन कि मी अंतरावरून महिला पुरुषांना पाणी आणावे लागते. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदाकडे करुन पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्याप पर्यत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे बंधाऱ्यातील दुषित पाणी प्यावे लागत आहे. - चंदर मधुकर दळवी, ग्रामस्थ निळमाती