वसईत गुजराती फलकांविरोधात मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST2018-03-20T00:30:09+5:302018-03-20T00:30:09+5:30
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धाबे आणि हॉटेलवर गुजराती भाषेत असलेल्या फलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री मोडतोड केली. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुकान आणि हॉटेलांवरील असलेल्या गुजराती पाट्यांविषयी उल्लेख केला होता.

वसईत गुजराती फलकांविरोधात मनसे आक्रमक
वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धाबे आणि हॉटेलवर गुजराती भाषेत असलेल्या फलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री मोडतोड केली. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुकान आणि हॉटेलांवरील असलेल्या गुजराती पाट्यांविषयी उल्लेख केला होता. सभा आटोपून घरी जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी हायवेवरील गुजराती फलकांना लक्ष्य केले. कार्यकर्त्यांनी हायवेवर गुजराती फलक खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. वसई विरारच्या अनेक व्यापाºयांनी आणि कारखानदारांनी गुजराती फलक लावण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पत्त्यात वसई, गुजरात असा उल्लेख केला आहे. कार्यकर्त्यांनी यावर कारवाईची मागणी पालिकेकडे केली होती. पण, पालिकेने दखल घेतली नव्हती. सभेनंतर कार्यकर्त्यांनी फलकांची मोडतोड केली.
कांदिवलीत आंदोलन
मुंबई : कांदिवली पश्चिमच्या एमजी रोडवरील ‘राजूभाई ढोकलावाला’ या दुकानाच्या पाटीची सोमवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या दुकानाची पाटी गुजराती भाषेत होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच दुकानमालकाला पाटी मराठी भाषेत करण्यासाठी पत्र दिले होते. तरीही दुकानाची पाटी बदलण्यात न आल्याने कांदीवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी दुकानाच्या पाटीची तोडफोड केली. मनसेचे चारकोप-कांदीवलीचे नेते दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या भागातील अनेक दुकानांवरील गुजराती पाट्यांना काळे फासले आणि तोडफोडही केली.