मालकिणीने कामगारांच्या अंगावर घातली गाडी; पालघरमधील कंपनीच्या गेटवर संतापजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:49 IST2025-08-06T13:49:07+5:302025-08-06T13:49:51+5:30
पालघर पूर्व येथील मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स बनवणारी कंपनी असून, या कंपनीत वर्षांपासून काम करणाऱ्या ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या.

मालकिणीने कामगारांच्या अंगावर घातली गाडी; पालघरमधील कंपनीच्या गेटवर संतापजनक प्रकार
पालघर : पालघर पूर्व वेवूर येथील मस्तांग इंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने मंगळवारी आंदोलन करणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या मालकिणीची कार बोलण्याकरिता थांबविली. त्यामुळे संतप्त झालेल्या कंपनी मालकीण नाजनीन कात्रक यांनी कामगारांच्या अंगावर कार घातली. मंगळवारी घडलेल्या घटनेत विद्या यादव (२७) ही कामगार महिला जखमी झाली.
पालघर पूर्व येथील मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स बनवणारी कंपनी असून, या कंपनीत वर्षांपासून काम करणाऱ्या ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी महिलांना दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत काम करण्याच्या सूचना दिल्यावर कामगारांनी विरोध दर्शविला. त्यामुळे रविवारपासून गेटवर असताना कंपनीने ४५ कामगारांना कामावर हजर करून घेण्यास नकार दिला. पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याबाबत कंपनी व्यवस्थापकाला फोन करून विचारले असता व्यवस्थापकाकडून मज्जाव केल्याचे सांगितले.
असा घडला प्रकार
कामगार कंपनीसमोर व्यवस्थापनाशी बोलण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी कंपनीतून कारमधून कंपनी मालक नाजनीन या बाहेर जात होत्या. कार थांबविल्याने संतप्त झालेल्या नाजनीन यांनी ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून कारचा ताबा घेतला.
त्यानंतर कामगारांच्या अंगावर कार घातली. यामध्ये विद्या रामकुमारी यांच्या पायावरून गाडी नेल्याने ती जखमी झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
जबाब घेण्याचे काम सुरू
या प्रकरणात उशिरापर्यंत जाब जबाब घेण्याचे काम सुरू असून, गुन्हा दाखल झाला नसल्याचे पालघर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी ‘ सांगितले. मस्तांग कंपनीच्या नाजनीन यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कंपनीत गेले असता कंपनी मालक आल्यानंतर संपर्क साधला जाईल, असे कंपनीतील सुरक्षारक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले.