Mira Bhayander Municipal Corporation and its corporators neglect the hospitality and safety of foreign guests | परदेशी पाहुण्यांच्या पाहुणचार व सुरक्षितते कडे मीरा भाईंदर महापालिका आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष 

परदेशी पाहुण्यांच्या पाहुणचार व सुरक्षितते कडे मीरा भाईंदर महापालिका आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क येथील खाडी किनारा हा सीगल या परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी प्रेक्षणीय ठरलाय . परंतु वन्य जीव कायद्या खाली संरक्षित तसेच लहान - मोठयां साठी आकर्षण ठरलेल्या ह्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षितते कडे मात्र महापालिकेसह स्थानिक नगरसेवकांनी नेहमी प्रमाणेच कमालीचे दुर्लक्ष केल्याने काही बेजबाबदार नागरिक सर्रास ह्या पक्ष्याना तेलकट , तिखट आदी खाद्य पदार्थ खायला घालून त्यांच्या जीविताशी खेळ करत आहेत . 

जेसलपार्कचा खाडीकिनारा सध्या सीगल अर्थात कुरव या समुद्री पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. युरोपीय व आशियाई देशांतून आलेले हे पाहुणे थंडीच्या मोसमात येथे खाडी किनारी आपला मुक्काम ठोकतात .  सीगल येथे खाडी व किनाऱ्यावर मिळणाऱ्या त्यांच्या नैसर्गिक आहार व वातावरणानुसार जानेवारीपर्यंत वा त्यानंतरसुद्धा काही काळ थांबतात. 

हे सीगल खाडीच्या पाण्यात आपले भक्ष्य टिपण्यासाठी झेपावताना दिसतात व  पाण्यात पोहताना दिसतात . सीगलचा किलबिलाट आणि त्यांचे सौंदर्य सर्वसामान्यांना भुरळ घालणारे आहे. या परदेशी पक्ष्यांचे थवे किनाऱ्यावर किलबिलाट करताना पाहायला मिळत आहेत.

या परदेशी पाहुण्यांबद्दल स्थानिकांनासुद्धा फारशी माहिती नाही. वास्तविक मासे , किडे आदी या पक्ष्यांचे नैसर्गिक खाणे आहे . त्यासाठीच ते खाडी किनाऱ्यावर तळ ठोकतात .  तसे असताना लोकं त्यांना गाठिया, फरसाण, शिळ्या चपात्या आदी खाण्यास टाकतात. या मुळे पक्ष्यांना विकार जडण्यासह त्यांना उडणे तसेच नैसर्गिकरित्या स्वतःचा आहार टिपणे अवघड होते . त्यांचे आयुष्य कमी होते वा अश्या तेलकट, तिखट, शिळ्या खाण्याने  त्यांचा जीव जाण्याची शक्यता असते . 

सीगल हे वन्य जीव कायद्या नुसार संरक्षित असून देखील महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी ह्या परदेशी पाहुण्यांची काळजी घ्या कडे अक्षम्य डोळेझाक चालविल्याने येथे लोकं त्यांना तेलकट फारसं , गाठीया , कुरमुरे , दाणे , शिळ्या चपात्या आदी खाऊ घालत आहेत . परंतु अश्या लोकांना रोखण्यासाठी पालिकेने कोणतीच उपाययोजना केलेली नाही . २०१८ साली ह्या भागात वन विभागाने जनजागृती करून सीगल ना खाद्य पदार्थ खाऊ घालू नका असे फलक लावले होते . परंतु महापालिकेने मात्र आज पर्यंत कोणतीच जबाबदारी सीगल पक्ष्यांच्या सुरक्षितते बाबत घेतलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे . 

महापालिकेने बेकायदेशीरपणे मलमूत्र - सांडपाणी थेट खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित होऊन खाडीत मासळी आधीच नगण्य झाली आहे . त्यातच खाडीत मोठ्या प्रमाणात कचरा , निर्माल्य , कपडे , काचेचे फोटो फ्रेम आदी टाकले जात आहे . भरतीने देखील कचरा वाहून किनाऱ्यावर साचला आहे . त्यामुळे किनाऱ्यावरील चिखलात न्युटी माशांची वाढ तसेच खाडीतील विविध माशांची वाढ खुंटली आहे. महापालिका आणि नगरसेवक - राजकारणी ह्याला मूळ जबाबदार असल्याचा संताप वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केला .  

जेसलपार्क येथील वसईचा हा खाडीकिनारा पर्यावरण व जलजीवसृष्टीसाठी संवेदनशील असल्याचे सातत्याने जागरूक नागरिक निदर्शनास आणून देत असून देखील पालिका , नगरसेवक जाणीवपूर्वक डोळेझाक करतात . खाडी किनारी डॉल्फिन चे होणारे मृत्यू देखील चिंतेचे विषय ठरले आहेत . 

Web Title: Mira Bhayander Municipal Corporation and its corporators neglect the hospitality and safety of foreign guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.