पालघरमध्ये ‘चले जाव’च्या आठवणी ताज्या
By Admin | Updated: August 14, 2015 23:06 IST2015-08-14T23:06:52+5:302015-08-14T23:06:52+5:30
इंग्रजांविरोधातील ‘चले जाव’ या आंदोलनाच्या काळात पालघरमध्ये मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ

पालघरमध्ये ‘चले जाव’च्या आठवणी ताज्या
पालघर : इंग्रजांविरोधातील ‘चले जाव’ या आंदोलनाच्या काळात पालघरमध्ये मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी सर्व पालघरवासीयांनी एकत्र जमून त्यांच्या स्मृतींना वंदन केले. या वेळी राष्ट्रध्वजाला नगराध्यक्षा प्रियंका पाटीलसह मान्यवरांनी वंदन केले. या वेळी पालघर शहरातील सर्व दुकाने व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी ‘चले जाव’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघर तालुक्यातून पालघर कचेरीवर १४ आॅगस्ट १९४२ रोजी ‘करेंगे या मरेंगे’च्या निर्धाराने काढलेल्या मोर्चावर ब्रिटिश अधिकारी अल्मेडा याने केलेल्या बेछूट गोळीबारात सातपाटीचे काशिनाथभाई पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामप्रसाद भीमशंकर तेवारी, सालवडचे सुकूर गोविंद मोरे, मुरब्याचे रामचंद्र महादेव चुरी या पाच तरुणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण करण्यासाठीत्यांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या ठिकाणी उभारलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ दरवर्षी १४ आॅगस्टला १२ वा. ३९ मिनिटांनी पुण्यस्मरण केले जाते. या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा, आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी दावभट, मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्यासह विद्याथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.