मेरीटाइम हलगर्जीचा मच्छीमारांना फटका

By Admin | Updated: August 13, 2015 23:10 IST2015-08-13T23:10:18+5:302015-08-13T23:10:18+5:30

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सातपाटीच्या मासेमारी व्यवसायाला बसत असून दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर पहिल्याच ट्रीपसाठी

Maritime Haljari fishermen hit | मेरीटाइम हलगर्जीचा मच्छीमारांना फटका

मेरीटाइम हलगर्जीचा मच्छीमारांना फटका

पालघर : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सातपाटीच्या मासेमारी व्यवसायाला बसत असून दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर पहिल्याच ट्रीपसाठी समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या किशोर आ. मेहेर यांची ‘नारायणी’ ही बोट नौकायन मार्गावरील खडकावर बुधवारी धडकली. यामध्ये बोटीचे मोठे नुकसान होऊन जीवितहानी टळली.
सातपाटी हे एक प्रगतिशील बंदर असून पालघर जिल्ह्यातून सर्वात जास्त मत्स्य उत्पादनाची (कोट्यवधी रुपये) उलाढाल दोन सहकारी संस्थांमार्फत करण्यात येते. यातून लाखो रु.चे परकीय चलन शासनाकडे जमा होत असते. मात्र, ८ ते १० वर्षांपासून सातपाटीची खाडी गाळाने भरली असून मच्छीमारांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. सातपाटी खाडीच्या नौकानयन मार्गात अनेक सॅण्डबार व खडक निर्माण झाले असून खाडीमध्ये उंच वाळूची पठारे निर्माण झाली आहेत. त्यामुळे मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमारांना मोठ्या उधाणाची वाट पाहावी लागते. परिणामी, मासेमारीचे दिवस वाया जात मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाययोजना आखावी म्हणून मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.
पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली ११ आॅगस्ट रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित बांगर, कृती समिती सरचिटणीस नरेंद्र पाटील, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, आ. विलास तरे, आ. पास्कल धनारे, जि.प. उपाध्यक्ष सचिन पाटील, सभापती अशोक वडे, ज्योती मेहेर, बविआचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील इ. सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये निधी उपलब्ध असतानाही तो वापरला जात नसल्याने पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आपण खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करणार असल्याचे आश्वासन मेरीटाइमचे अभियंते देवरे यांनी दिल्याचे राजन मेहेर यांनी सांगितले. अशी अनेक आश्वासने आतापर्यंत देवरे यांनी मच्छीमारांना दिली असून त्यांच्या दुर्लक्षामुळे सातपाटी खाडीतील समस्यांवर उपाययोजना केल्या जात नसल्याने काल दुपारी धोकादायक खडकाजवळ कुठलेही गाइड पोल उभारले गेले नसल्याने किशोर मेहेर यांची बोट खडकावर आदळली. या वेळी रत्नाकर मेहेर यांच्यासह त्याच्या बोटींनी तत्काळ मदत पोहोचवली नसती तर प्राणहानीसह मोठी वित्तहानीची घटना घडली असती. (वार्ताहर)

Web Title: Maritime Haljari fishermen hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.