अनेक गावांना उधाणाचा धोका
By Admin | Updated: April 15, 2016 01:16 IST2016-04-15T01:16:22+5:302016-04-15T01:16:22+5:30
एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला

अनेक गावांना उधाणाचा धोका
डहाणू : एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असून चिंचणी ते बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधण्याच्या मागणीकडे मेरीटाईम बोर्ड तसेच शासन दुर्लक्ष करीत असल्याने हजारो मच्छीमार बांधवांत संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात आपल्या घरांचे काय होईल या भीतीने गोरगरीब मच्छीमार, खलाशी धास्तावले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून डहाणू समुद्रकिनाऱ्यालगतच्या मच्छीमार पाड्यांच्या वस्तीला समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. डहाणूचा धूपप्रतिबंधक बंधारा फुटल्याने समुद्राच्या लाटांच्या मारा थेट वस्तीवर होत आहे. त्यामुळे धा. डहाणू, सोनापूर, मांगेळआळी, किर्तने बंगला, दुबळपाडा, सतीपाडा, पारनाका, आगर इ. ठिकाणच्या मच्छीमारांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची धावपळ उडाली होती. गेल्या वर्षी हाय टाईड मुळे कल्पना महेश राठोड या विधवा निराधार महिलेचे घर उध्वस्त झाले होते. त्यावेळी तहसिलदार नगरपरिषद प्रशासनाने तेथे भेट देऊन त्यास सरकारी आर्थिक मदतीबाबतीत आश्वासने दिली होती. मात्र तिला अद्यापी काहीही मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे समुद्राच्या लाटांमुळे येथील धूप प्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त झाले आहेत. तरीही येथे प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने भरतीचे पाणी गावाची वेस ओलांडून रहिवाशांच्या घरात घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या दोन, तीन वर्षापासून खवळलेल्या समुद्राच्या महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून थेट बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होत असून किनारा पूर्णत: खचला आहे. (वार्ताहर)
येत्या दोन, तीन वर्षात पावसाळ्यात अशीच धूप होत राहिली तर येथील मच्छीमारांची घरे, सुरूंची बने तसेच सौदर्य जमीनदोस्त होण्याची भीती पंचायत समितीचे सदस्य तसेच मच्छीमार नेते शिवदास अंभिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मर्दे यांनी व्यक्त केली. येथील किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमार, नागरीक तसेच पर्यटकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. किनारपट्टीवरील भूमिपुत्रांचा बळी गेल्या शिवाय जागे व्हायचेच नाही असे सरकारने ठरवले आहे काय
असा संतप्त सवाल भूमिपुत्र करीत आहेत.