पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:03 AM2021-02-02T01:03:01+5:302021-02-02T01:03:26+5:30

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे.

Lotangana in front of CIDCO laid by Palghar Municipal Council | पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

Next

- हितेन नाईक
पालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. यापूर्वी विरोध दर्शवून काही कालावधीत निर्णय बदलून नगरपरिषदेने सिडकोपुढे लोटांगण घातल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पालघर जिल्ह्याचे मुख्यालय सिडकोच्या माध्यमातून कोळगाव येथे उभारले जात असून त्यासाठी सिडकोने नगरपरिषदेच्या २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या कोट्यातील २ दलघमी इतक्‍या पाण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यास कमतरता भासत असल्याचे सांगत नगरपरिषदेने त्यांची मागणी यापूर्वी फेटाळली होती. त्याच वेळी सूर्या प्रकल्पांतर्गत पाण्याची उपलब्धताही नेहमी राहत नसल्याने सिडकोची मागणी जलसंपदा विभागाने अमान्य केली होती. त्यामुळे नगरपरिषदेने पाणी देऊ नये असा ठराव एकमताने घेण्यात आला असताना आता अचानक नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घुमजाव करीत पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे राजकीय दबावामुळे घडले की अंतर्गत बाबीवर निर्णय झाला याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या निर्णयाला भाजपच्या विरोधी पक्ष गटनेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनाच पुरेसे पाणी मिळत नसताना सिडकोसाठी एवढे उदार होण्याची भूमिका नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे व त्यांच्या टीमने का घेतली? याचे उत्तर पालघरवासीयांना द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे. नगरपरिषदेने पाणी देण्याचे मान्य केल्याने त्यांना आता प्रतिदिन पाच लाख लीटर पाणी द्यावे लागणार असून पालघर नगरपरिषद क्षेत्रात नागरीकरण वाढत असताना त्यांच्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन काय, याचे कुठलेही उत्तर सध्या नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे पालघरकरांवर आणि अन्य २० गावांवर पाण्याच्या दुर्भीक्ष्यतेचे संकट ओढवू शकते.

जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने त्यांना नियमानुसार पाणी द्यावे लागते.
- डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षा

नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची पाळी उद्भवू शकते.
- भावानंद संखे, भाजप विरोधी पक्षनेते

नगरपरिषद क्षेत्रासह अन्य २० गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसताना मुख्यालयाला पाणी देणे कितपत योग्य आहे?      - संतोष चुरी, नागरिक, पालघर
 

Web Title: Lotangana in front of CIDCO laid by Palghar Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.