जिंदालच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध

By Admin | Updated: September 23, 2015 03:50 IST2015-09-23T03:50:16+5:302015-09-23T03:50:16+5:30

मे. जेएसडब्लु (जिंदाल) इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या अर्थसहाय्याने स्त्रि-पुरूष समानतेचा कार्यक्रम मुरबे ग्रामपंचायतीने मंगळवारी आयोजित केल्याचे समजल्यानंतर

Local protest against Jindal's program | जिंदालच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध

जिंदालच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध

पालघर : मे. जेएसडब्लु (जिंदाल) इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या अर्थसहाय्याने स्त्रि-पुरूष समानतेचा कार्यक्रम मुरबे ग्रामपंचायतीने मंगळवारी आयोजित केल्याचे समजल्यानंतर स्थानिक मच्छीमार बागायतदारांना उद्ध्वस्त करणाऱ्या जिंदाल कंपनीचे अर्थसहाय्य घेऊ नका व उद्ध्वस्त होऊ नका अशा घोषणा देत स्थानिकांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सातपाटी सागरी पोलीसांनी हा प्रयत्न हाणुन पाडला.
पालघर तालुक्यात जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या मौजे नांदगाव-आलेवाडी येथे बारामाही बंदर विकास प्रकल्प प्रस्तावित असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मालाची हाताळणी व वाहतुक तसेच इतर औद्योगिक प्रकल्पाच्या मालाची वाहतुकीचा १ हजार १७५ कोटीच्या गुंतवणूकीचा प्रोजेक्ट होणार आहे. परंतु या बंदरामुळे स्थानिक मच्छीमारी व्यवसाय उध्वस्त होणार असून स्थानिकांच्या बागायती नष्ट होऊन प्रदुषणाचा मोठा फटका येथील लोकांना बसणार असल्याने या बंदर उभारणीला सर्व स्तरातुन विरोध दर्शविण्यात आला होता. बोईसर येथे आलेल्या जनसुनवाईमध्येही हजारो स्थानिकांनी आपली उपस्थिती दाखवीत आपला लेखी विरोध नोंदविला होता तर केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागानेही आलेवाडी बंदर हे तारापुर अणुऊर्जा प्रकल्पापासून हवाई अंतराने खुप जवळ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प रद्द करावा अशी शिफारस शासनाने केली होती. १५ सप्टेंबर २०१३ रोजी ही जिंदालच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर आपण हा प्रकल्प रद्द करू असे आश्वासन जिंदाल समुहाचे संचालक सज्जन जिंदाल यांनी लेखी स्वरूपात ग्रामस्थांना दिले होते. परंतु तरीही जिंदाल समुहाकडून सिएसआर फंडाच्या नावावर मच्छीमाराना जाळी, फ्लोटस्, दिले जात असून विरोध करणाऱ्यांना विविध आमिष दाखवून त्यांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न जिंदाल व्यवस्थापनाकडून करण्यात येत असल्याची टिका स्थानिकांमधून केली जात आहे. अनेक लोकांच्या सहली, महिलांचे कार्यक्रम आखून सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आम्ही कुठेही कमी पडत नसल्याचे सर्वत्र भासवले जात असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक राजकीय पक्षाना निवडणुक फंडही पुरवला जात असून पडद्याआडून हे राजकीय पक्ष बंदर उभारणीला सहकार्य करीत असल्याचा आरोप नांदगावचे ग्रा. पं. सदस्य धिरज गावड यांनी यावेळी केला.
मुरबे ग्रा. प. नी जिंदाल पुरस्कृत मानस एकात्मिक सामाजिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन मुरबे येथे स्त्रि पुरूष समानता या विषयावर वर्षभराचा उपक्रम हाती घेतला. आज या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचीन पाटील, सभापती विनीता कोरे, माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, राजेंद्र गावित, सिईओ दिलीप शिंदे, बिडीओ डि वाय जाधव, पं. स. सदस्य जितेंद्र मेर, डॉ. हेमंत संखे इ. मान्यवर उपस्थित राहणार असताना नांदगाव ग्रा. प. च्या सरपंचा विधी मोरे, उपसरपंच शर्मिला राऊत, सदस्य धिरज गावड, ग्रामस्थ, धर्मेद्र पाटील, मनिष पाटील, मोहन राणे इ. ग्रामस्थांनी कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहुन जेएसडब्ल्यु मुरबे ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणा देऊन उपस्थित मान्यवरांचा निषेध व्यक्त केला. (वार्ताहर)

Web Title: Local protest against Jindal's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.