महावितरणचे वॉलेट अॅप लॉन्च; बेरोजगाराना रोजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:45 IST2019-07-22T22:45:01+5:302019-07-22T22:45:37+5:30
वीज देयकांचा भरणा करण्यासाठी वीज ग्राहकांना ४० ते ५० रुपये प्रवासासाठी खर्च होत असतो, तर वीज देयकांच्या रांगेत बराच वेळ उभेही राहावे लागते.

महावितरणचे वॉलेट अॅप लॉन्च; बेरोजगाराना रोजगाराची संधी
वसई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने विजेचा भरणा करण्यासाठी आता महावितरणने वॉलेट अॅप सुरु केले असून यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. या अॅपच्या सहाय्याने वीज बिल भरणा होणार असल्याने या अॅपची महावितरणकडे ऑनलाइन नोंदणी करून कोणीही भरणा केंद्राप्रमाणे बिले स्वीकारू शकणार आहे. पत्रकार परिषदेत या अॅपची माहिती देण्यात आली.
वसईचे अधीक्षक अभियंता अग्रवाल यांनी सांगितले की, यासाठी सुरुवातीला स्वत:चे आधारकार्ड व पॅनकार्ड यासह पाच हजार रुपये इतक्या रकमेचा भरणा करावा लागणार असून त्यानंतर पाच हजार रुपयापर्यंत वीज बिले भरता येणार आहेत. तर यामध्ये प्रत्येक वीज देयका मागे ५ रुपये कमिशनपोटी मिळणार आहेत. तसेच, रिचार्ज संपल्यावर पुन्हा ते रिचार्ज करून त्यातून वीज देयकेही भरता येणार असल्याने छोटे दुकानदार, इतर संस्था याचा वापर करून चांगला नफा देखील मिळवता येणार आहे.
दरम्यान वीज देयकांचा भरणा करण्यासाठी वीज ग्राहकांना ४० ते ५० रुपये प्रवासासाठी खर्च होत असतो, तर वीज देयकांच्या रांगेत बराच वेळ उभेही राहावे लागते. यामुळे पैसा आणि वेळ या दोन्हींचा अपव्यय होतो. महावितरणने वीजग्राहकांना होणारा त्रास ओळखून वीज देयके भरणा यामध्ये पारदर्शकता यावी व ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी हे अॅप सुरू केले आहे. याचा फायदा सर्वाधिक वीजग्राहकांना होईल, असा विश्वास याप्रसंगी वसई महावितरणचे वसई अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. याचा फायदा प्रामुख्याने दुर्गम व अतिदुर्गम भागातील वीज ग्राहकांना होईल. वीज बिले भरण्याची सोय झाली परंतु ती अचूक आणि वेळेवर मिळतील यासाठीही महावितरणने उपायोजना करावी अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.