कुर्झे धरणाची सुरक्षा वाऱ्यावरच; भूकंपाचाही धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:32 IST2019-11-17T22:32:40+5:302019-11-17T22:32:53+5:30
वीज नाहीच, वीजपुरवठ्याअभावी सुरक्षा धोक्यात; कर्मचारी तैनात

कुर्झे धरणाची सुरक्षा वाऱ्यावरच; भूकंपाचाही धोका
तलासरी : तलासरी, डहाणू भागात पडलेला परतीचा पाऊस आणि सातत्याने बसणारे भूकंपाचे धक्के अशा वेळी आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण हे धरणाचे दरवाजे उघडण्यास आवश्यक वीज पुरवठाच धरणावर नाही, याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नाही.
कुर्झे धरणावर नऊ महिन्यापासून वीज नाही, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करताच, धरणावर वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वीज विभागाने केला. पण चाळीस वर्षांपूर्वीच्या जीर्ण तारा तसेच डबघाईला आलेले ट्रान्सफॉर्मर यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे वीज विभागाचे उपअभियंता प्रशांत दोडे यांनी सांगितले.
दापचरी दुग्ध प्रकल्पाची वीज व्यवस्था सार्वजनिक बांधकाम खात्याचे वीज विभाग बघते. त्याचा कारभार कल्याणवरून चालतो. या दुग्ध प्रकल्पात असलेल्या वीज तारा, ट्रान्सफार्मर हे चाळीस वर्षांपूर्वीचे आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी तसेच बदलण्यासाठी निधीची गरज आहे. पण हा निधी दुग्ध आयुक्तांकडून दिलाच जात नसल्याने प्रकल्पात अनेक वीज समस्या आहेत. प्रकल्पाची वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून दुग्ध विकास आयुक्तांकडे प्रलंबित आहे. वीज पुरवठा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव असल्याने प्रकल्पाला वीज दुरु स्तीसाठी निधीही दिला जात नाही. ना निधी ना हस्तांतर यामुळे वीज पुरवठ्याअभावी धरणाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.
वीज पुरवठा होत नसल्याने आपत्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यास बांधकाम विभागाने धरणावर कर्मचारी नेमल्याचे प्रकल्प बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनिअर कुंदन वाघ यांनी सांगितले. पण आपत्तकालीन परिस्थितीत दरवाजे कर्मचाºयांकडून तत्काळ उघडतील का याबाबत त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तर, दापचरी दुग्ध प्रकल्पाचे सहा. प्रकल्प अधिकारी एस.सी. चौधरी यांनी फोनच उचलला नाही.