जव्हारचा शाही दसरा अत्यंत उत्साहात, आज रंगणार महिला मल्लांसह कुस्त्यांचे सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:29 IST2017-10-01T05:29:48+5:302017-10-01T05:29:58+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात दोनच ठिकाणचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यातला एक कोल्हापूरचा आणि दुसरा जव्हारचा. संस्थानकाळाची परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव आज मोठ्या जल्लोषात नगर परिषद व उत्सव समितीच्या संयुक्त विद्यामाने थाटात संपन्न करण्यात आला.

जव्हारचा शाही दसरा अत्यंत उत्साहात, आज रंगणार महिला मल्लांसह कुस्त्यांचे सामने
- हुसेन मेमन।
जव्हार : संपूर्ण महाराष्ट्रात दोनच ठिकाणचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यातला एक कोल्हापूरचा आणि दुसरा जव्हारचा. संस्थानकाळाची परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव आज मोठ्या जल्लोषात नगर परिषद व उत्सव समितीच्या संयुक्त विद्यामाने थाटात संपन्न करण्यात आला.
सायंकाळी पाच वाजता दरबारी दसºयाच्या मिरवणूकीस सुरवात झाली, यशवंतनगर मोर्चा विजय स्तंभापासून थेट हनुमान पॉइंटपर्यंत ती नेण्यात आली. जव्हारचे राजे जयबाराजे यांचे संस्थान आणि जव्हार मधील त्यांचा पूर्वीचा जुना राजवाडा कसा होता. त्याचे दर्शन घडविणारे चित्ररथ आजच्या मिरवणूकीत सादर करण्यात आले होते. या जुन्या चित्ररथावर राजे जयबा मुकणे व त्यांचे दरबारकरी त्या काळातील वेषभूषा करून आरूढ झाले होते. तसेच तारपानाच, ढोलनाच, तुरानाच, लोककला, नृत्य या मिरवणूकीत सादर करण्यात आले. तसेच राजांच्या पुतळ्याला पुष्प हार घालून मानवंदना देवून, हनुमान पॉइंट या ठिकाणी उभारलेल्या राक्षसाच्या भव्य पुतळ्याचे दहन करण्यात आले व आकाशामध्ये रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी हजारो जव्हारकरांनी याचा आनंद घेतला.
यावेळी खास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार व जव्हार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथे शनिवारी रात्री ८.३० ला नृत्य महोत्सव व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमासाठी गांधी चौकाच्या मध्येच मान्यवरांची बैठक व्यवस्था करण्यात आल्यामुळे काही नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी कुस्त्यांचे जंगी सामने होणार आहेत. त्यात स्त्री मल्लांच्या लढती होतील.
जव्हार मधील जुना राजवाडा या ठिकाणी कुस्त्यांचे जंगी सामने होतात. त्यासाठी पालघर, भिवंडी, नाशिक, ठाणे, इगतपुरी, घोटी, या जिल्यातील अनेक लहान-मोठे मल्ल येतात. त्यात स्त्री मल्लांचाही समावेश असतो. त्यांच्या कुस्त्या हे या स्पर्धांचे खास आकर्षण असते.