दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:32 IST2025-07-28T10:32:22+5:302025-07-28T10:32:42+5:30

रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

is there anyone who is responsible for the passengers of diva vasai route | दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का?

दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का?

कल्पेश पोवळे, उपसंपादक

महामुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेवर जेवढे बोलावे तेवढे कमी. लोकल प्रवाशांच्या समस्यांना अंत नाही. कल्याण-डोबिंवलीपासून ते पश्चिम उपनगरांतील अनेक स्टेशनवरील प्रवाशांचे लोकल प्रवासात रोज हाल होतात. त्यात दिवा व वसईकरांच्या समस्यां जैसे थे आहेत. पूर्वीच्या दिवा-वसई या मार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देऊन एक दशक लोटले आहे. पण, या मार्गावर उपनगरी सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू करण्याबाबत आतापर्यंत हजारो वेळा त्या-त्या वेळच्या सरकारांनी आश्वासन दिले. मात्र, त्याचा त्यांना विसर पडतो. सुरुवातीला रेल्वेकडे गाड्या नव्हत्या. पण, आता ती कमतरताही भरून निघाली आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

उपनगरी रेल्वेच्या सध्याच्या हार्बर, मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्ग यांना सहज जोडणारा मार्ग म्हणून पनवेल-वसई मार्गाकडे पाहायला हवे. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या चारही महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. उरणपासून (जेएनपीटी) दिल्लीपर्यंत जाणारा जलदगती मालवाहतूक मार्ग या मार्गाला लागूनच आहे. अशात काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पनवेल-दिवा-वसई या मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली होती. मात्र, अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दिवा-पनवेल, दिवा-वसई या मार्गांवरील प्रवास जलदगतीने होईल.
सध्या या मार्गावर ‘मेमू’च्या माध्यमातून सेवा सुरू आहे. त्याच्या पनवेल आणि दिव्याकडून वसईच्या दिशेने आठ फेऱ्या होतात. पण, या परिसरातील नागरीकरण वाढत आहे, तसेच भिवंडी येथे मोठ्या प्रमाणात गोदामांची संख्या आहे. तसेच, अनेक उद्योगधंदे या भागात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने नोकरदार आणि व्यापाऱ्यांची ये-जा असते. मात्र, या मार्गावरील प्रवासी रडगाथा संपण्याची चिन्हे नाहीत. या मार्गावर मेमू वेळेवर येत नसल्याचा अनुभव अनेकदा येतो. अशात काही दिवसांपूर्वी मेमू उशिराने आल्याने प्रवाशांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केले होते. प्रवाशांनी आता आंदोलने तरी किती वेळा करायची. त्यांना तात्पुरते आश्वासन दिले जाते. पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न.

नव्या पर्यायामुळे गर्दीवर उतारा

रायगड जिल्हा त्यासोबतच मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवाशांना पालघर पट्ट्यात, पुढे गुजरातच्या दिशेने जलदगतीने पोहोचण्यासाठी पनवेल-दिवा-वसई मार्गावर लोकल सुरू करणे गरजेचे आहे. त्यातून मध्य रेल्वेचे मुख्य, हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे जोडले जातील. गर्दीवर उतारा मिळेल. तसेच, पनवेल, कोपर, भिवंडी, वसईकरांना प्रवासाचा नवा पर्याय खुला होईल.

का आहे या मार्गाची गरज?

पनवेल ते कोपर, भिवंडी, खारबाव, जुचंद्र या भागात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू आहे. या मार्गावर लोकल सेवा सुरू झाली, तर त्यांना सोयीचा वाहतूक पर्याय उपलब्ध होईल. तसेच मध्य व पश्चिम रेल्वेमार्गाला जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.  

Web Title: is there anyone who is responsible for the passengers of diva vasai route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.