आयर्नमॅन हार्दिक पाटील यांचे ४२ पूर्ण आणि २४ अर्ध आयर्नमॅन स्पर्धांचे ऐतिहासिक 'विश्वविक्रमी' यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:53 IST2025-12-23T15:52:47+5:302025-12-23T15:53:11+5:30
२०२५ मध्ये १५ जागतिक स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण

आयर्नमॅन हार्दिक पाटील यांचे ४२ पूर्ण आणि २४ अर्ध आयर्नमॅन स्पर्धांचे ऐतिहासिक 'विश्वविक्रमी' यश
नालासोपारा (मंगेश कराळे) :- साहसी क्रीडा क्षेत्रातील सीमा ओलांडून भारताचे नाव जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरांनी कोरणारे 'आयर्नमॅन' हार्दिक पाटील यांनी २०२५ या वर्षात मानवजातीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. भारताचे नाव जागतिक साहसी क्रीडा नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरणारे 'आयर्नमॅन' हार्दिक पाटील यांनी २०२५ या वर्षात एक अभूतपूर्व आणि अशक्यप्राय वाटणारा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२४ मध्ये १० पूर्ण आयर्नमॅन, १ अल्ट्रामॅन आणि २ वर्ल्ड मेजर मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम केल्यानंतर, त्यांनी २०२५ या एकाच वर्षात जगभरातील अत्यंत खडतर अशा १५ जागतिक स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून क्रीडा विश्वाला थक्क केले आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हार्दिक पाटील यांनी आजतागायत तब्बल ४२ पूर्ण आणि २४ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून जागतिक क्रीडा क्षितिजावर अनेक अनन्यसाधारण विक्रमांची नोंद केली आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची पराकाष्ठा करत त्यांनी प्रस्थापित केलेले हे विक्रम आगामी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील.
हार्दिक यांनी २०२५ च्या सुरुवातीपासूनच आपला धडाका कायम ठेवला. मस्कतच्या वाळवंटापासून ते अमेरिकेच्या टेकड्यांपर्यंत आणि ऑस्ट्रेलियाच्या समुद्रापर्यंत त्यांनी भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला. आयर्नमॅन ७०.३ मस्कत (ओमान) ८ फेब्रुवारी, टोकियो मॅरेथॉन (जपान) २ मार्च, दक्षिण कोरिया मॅरेथॉन १६ मार्च, टी १०० सिंगापूर ५ एप्रिल, आयर्नमॅन टेक्सास (यूएसए) २६ एप्रिल, आयर्नमॅन ७०.३ द नांग (व्हिएतनाम) ११ मे, आयर्नमॅन केर्न्स (ऑस्ट्रेलिया) १५ जून, आयर्नमॅन कलमार (स्वीडन) १६ ऑगस्ट, सिडनी मॅरेथॉन (ऑस्ट्रेलिया) ३१ ऑगस्ट, आयर्नमॅन नीस (फ्रान्स) १४ सप्टेंबर, आयर्नमॅन लंकावी (मलेशिया) १ नोव्हेंबर, आयर्नमॅन ७०.३ गोवा (भारत) ९ नोव्हेंबर, टी १०० दुबई १६ नोव्हेंबर, आयर्नमॅन कोझुमेल (मेक्सिको) २३ नोव्हेंबर, आयर्नमॅन बसेलटन (ऑस्ट्रेलिया) ७ डिसेंबर या त्यांनी २०२५ मध्ये स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.
अवघ्या १२ महिन्यांत जगभरातील ५ वेगवेगळ्या खंडांमध्ये प्रवास करून, तिथल्या हवामानाशी जुळवून घेत एकामागून एक स्पर्धा पूर्ण करणे, हे हार्दिक पाटील यांच्या अचाट इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. आयर्नमॅन स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे याचा समावेश असतो. अशा अनेक स्पर्धा सलग पूर्ण करून त्यांनी 'मराठी मातीचा' पराक्रम जगाला दाखवून दिला आहे.
हार्दिक यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक विजय नसून, तो प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः पालघर जिल्ह्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाने येणाऱ्या पिढीतील खेळाडूंना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा दिली आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर जागतिक क्षितिजावर भारताचे नाव अजरामर करणाऱ्या या महानायकाचे कौतुक संपूर्ण देश करत आहे.
त्यांच्या नावावर आता अनेक साहसी विश्वविक्रमांची नोंद झाली असून, त्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युवा खेळाडूंसाठी हार्दिक पाटील हे एक प्रेरणास्थान बनले आहेत.